"मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड...", बचत गटाच्या महिलांचा कॉल व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:00 PM2024-03-04T23:00:41+5:302024-03-04T23:13:59+5:30
मुक्ताईनगरबरोबरच जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
जळगाव : मुक्ताईनगरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाच्या शुभारंभाचा कार्यक्रम पाडला. मात्र या कार्यक्रमाला महिला बचत गटातील महिला उपस्थित राहिल्या नसल्यास त्यांना ५० रुपयांचा दंड भरण्याची सक्ती करण्यात आली. याबाबतचा बचत गटाच्या अध्यक्षा आणि कार्यकर्त्या ज्योत्स्ना महाजन यांनी फोनवरून महिला बचत गटाच्या महिलांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी धमकावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी ज्योत्स्ना महाजन आणि दुसऱ्या महिलेचे कॉल रेकॉर्डिंग ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुक्ताईनगरबरोबरच जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने ट्वीट करत म्हटले की, आज मुक्ताईनगर तालुक्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त भूमिपूजनासाठी येत आहेत. महिला बचत गटाच्या महिला भगिनींनी माझ्याशी संपर्क साधून मला असे सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात आहे. आम्ही जर उपस्थित नाही राहिलो तर, आमच्याकडून 50 रुपये दंड आकारले जातील, बचत गटातून काढून टाकण्यात येईल आणि कारवाई केली जाईल. असे बचत गटाच्या अध्यक्षा तसेच आमदारांच्या कार्यकर्त्या ज्योत्स्ना महाजन यांनी सांगितले आहे.
महिला बचत गटाच्या भगिनींनी मला काही स्क्रीन शॉट आणि रेकॉर्डिंग ऐकवलेल्या आहेत. महिला भगिनींना दमदाटी करण्याचा ज्या ज्योत्स्ना महाजन प्रयत्न करत आहेत, त्यांना मी फोन करून शहानिशा केली. त्यावर त्यांनी त्याची कबुली देखील दिलेली आहे. आमची सरकारला एकच विनंती आहे की, ‘या महिला बचत गटात ज्या भगिनी काम करतात त्यांची परिस्थिती बिकट आहे. आज त्यांना हाताला काम पाहिजे. आज कोणाची मुले, सासू-सासरे आजारी असू शकतात. कोणाला शेतात जायचे असेल. दिवसाचा रोज पाडून त्यांना जर कार्यक्रमाला जाणे शक्य नसेल तर त्यांच्यावर जबरदस्ती कशासाठी केली जात आहे?’
मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, ‘आपल्या कार्यक्रमाला ज्यांना मनाने यायचे आहे. त्यांना यायला कोणीही थांबवत नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच. मुख्यमंत्र्यांचे स्वागतच आहे मुक्ताईनगर तालुक्यात, पण माता भगिनींना त्रास देऊन किंवा त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलंच पाहिजे. ही जी भूमिका आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
आज मुक्ताईनगर तालुक्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे एका कार्यक्रमानिमित्त भूमिपूजनासाठी येत आहेत. महिला बचत गटाच्या महिला भगिनींनी माझ्याशी संपर्क साधून मला असे सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात आहे. आम्ही जर… pic.twitter.com/iAJdgRCFEY
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 4, 2024
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या एक्स हँडलवर दोन महिलांमधलं संभाषणही पोस्ट करण्यात आले आहे. मीनाक्षी आणि ज्योत्स्ना ताई अशा दोन महिलांचे हे संभाषण आहे.