गुप्तचर खात्यातील उणिवेवर ठेवले बोट

By admin | Published: October 18, 2015 01:47 AM2015-10-18T01:47:01+5:302015-10-18T01:47:01+5:30

गुप्तचर खात्यात संपूर्ण सेवा याच विभागात होईल, अशा मनुष्यबळाची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी शनिवारी विशेष वार्तालापात व्यक्त केले.

Finger Boat Insinuating | गुप्तचर खात्यातील उणिवेवर ठेवले बोट

गुप्तचर खात्यातील उणिवेवर ठेवले बोट

Next

मुंबई : गुप्तचर खात्यात संपूर्ण सेवा याच विभागात होईल, अशा मनुष्यबळाची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी शनिवारी विशेष वार्तालापात व्यक्त केले. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार झाला, त्याच्या पार्श्वभूमीवर अहमद यांचे हे मत लक्षणीय आहे.
काही काळापूर्वी गुप्त वार्ता (इंटेलिजन्स) विभागात अनुभव घेतलेल्या पोलिसांची राज्यात कोठेही बदली झाली, तरी त्यांच्या कामाचे स्वरूप बदलत नव्हते. पण आताशा या विभागातून त्यांची अन्य विभागात बदली होते. परिणामी त्याच्या गुप्त वार्तांकनातील अनुभवाला पोलीस खाते मुकते, यावर आयुक्तांनी अप्रत्यक्षरीत्या बोट ठेवले. गुप्त वार्ता विभागात नेमणूक झालेल्यांची सेवा थेट निवृत्तीपर्यंत याच विभागात ठेवण्याची व्यवस्था निर्माण होण्याचे संकेतही जावेद यांच्या मतातून मिळाले आहेत.
डान्सबारवर घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्याबाबत ते म्हणाले की, संपूर्ण आदेश वाचल्यानंतरच भविष्यात काय करता येईल याची योजना आखली जाईल. या मुद्यावर सरकरची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा सखोल अभ्यास करू. एकदा नियम तयार करण्यात आल्यानंतर त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील, असे जावेद यांनी स्पष्ट केले.
सुधीन्द्र कुलकर्णी प्रकरणी जे काही घडले ते मुंबई पोलिसांच्या गुप्तचरांचे अपयश होते काय? असे विचारले असता जावेद म्हणाले की, संभाव्य घटनांबाबत गुप्तचर माहिती देतच असतात.
कसुरी यांनी मणी भवन, जिना हाऊस आणि नेहरू सेंटरला भेट दिली होती. त्यापूर्वीच गुप्तचरांनी माहिती जमा केली होती; मात्र तो कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी आमचे आभारही मानले होते.
दहशतवादविरोधी पथकातील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या वेतनवाढीप्रमाणे स्पेशल ब्रॅचमधील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ का दिली नाही? असे विचारले असता जावेद म्हणाले की, अतिरिक्त वेतनवाढ ही प्रोत्साहनात्मक असते. ही सरकारची धोरणात्मक बाब आहे. त्याबाबत मी बोलणार नाही. (प्रतिनिधी)

सौदी अरेबियात अहमद राजदूत होणार
जानेवारीत सेवानिवृत्त झाल्यानंतर जावेद यांची सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरीही स्वत: जावेद यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, भविष्यात आपली कोठे नियुक्ती होईल याबाबत अंदाज बांधण्यात मला रस नाही. तसे मला आवडणारही नाही. याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनी मीच चकित झालो आहे. या मुद्यावर अंदाज बांधणे मला आवडणार नाही.

Web Title: Finger Boat Insinuating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.