शीतल म्हात्रे, बाळकृष्ण ब्रीद आणि हर्षद कारकर या नगरसेवकांविरोधात एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 02:58 PM2017-12-31T14:58:25+5:302017-12-31T14:58:35+5:30
मुंबई- आर उत्तरच्या सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि नगरसेवक हर्षद कारकर यांच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
मुंबई- आर उत्तरच्या सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि नगरसेवक हर्षद कारकर यांच्यावर दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. दहिसर पूर्व मराठा कॉलनी येथील ज्योती फैदी यांचे अधिकृत घर आणि येथील वैशाली पवार यांची संरक्षक भिंत नांदेडकर यांनी गेल्या 26 डिसेंबरला तोडली होती. या प्रकरणी गेल्या 28 डिसेंबरला दुपारी शिवसेनेने त्यांना 5 तास त्यांच्या कार्यालयात घेराव घातला होता. त्यानंतर नजरचुकीने आपण बांधकाम तोडल्याचे त्यांनी लेखी एसीपी यांच्या समोर लिहून दिले होते. तर 29 डिसेंबरला सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 1 च्या शिष्टमंडळाने सायंकाळी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन नांदेडकर यांच्या निलंबनाची मागणी केली होती.आता प्रभाग समिती अध्यक्षासह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांविरोधात नांदेडकर यांनी दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यामुळे येथील शिवसैनिकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे. आर उत्तर विभागात शिवसेनेचे जास्त नगरसेवक असून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी दहिसर येथील भाजपा आमदार मनीषा चौधरी यांच्या दबावामुळे सदर एफआयआर दाखल केला असल्याची चर्चा येथील शिवसैनिकांमध्ये आहे.