नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेच्या अरविंद भोसलेंविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 09:17 AM2017-09-26T09:17:28+5:302017-09-26T10:10:21+5:30
नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई- नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली तसंच जिथे पोस्टर्स लावले होते त्या भावात असलेल्या दुकानदारांनकडून अधिका माहिती घेऊन पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतं आहे. वरळी नाक्यावर नारायण राणे यांच्यावर टीका करणार पोस्टर लावल्यामुळे येत्या काळात शिवसेना - काँग्रेस यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेकडून वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं. ज्यात नारायण राणेंबाबत टीका करण्यात आली आहे. अरविंद भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग वरळी नाक्यावर चर्चेचा विषय होते. या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. ‘इच्छा माझी पुरी करा’ या शीर्षकाखाली नारायण राणे यांच्या विरोधातील पोस्टर लावण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या माध्यमातून नारायण राणेंवर कडाडून टीका केली आहे. या पोस्टरचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतरही नारायण राणेंची झाकली मूठ..!
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. माझ्यासोबत २५ आमदार येतील, असं आश्वासन राणेंनी शहा यांना दिल्याचं समजतं आहे. त्याआधी दानवे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राणे, दानवे व पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यावरून राणेंचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र शहा यांच्यासोबतच्या बैठकीत राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा झाली नाही. राणेंनी शहा यांना सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.