फेसबुकवर दिशाभूल करणारी पोस्ट टाकणाऱ्यावर एफआयआर
By admin | Published: February 17, 2017 02:40 AM2017-02-17T02:40:21+5:302017-02-17T02:40:21+5:30
राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयानंतर चामड्याची बॅग घेऊन प्रवास करत असताना एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याची तक्रार
मुंबई : राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयानंतर चामड्याची बॅग घेऊन प्रवास करत असताना एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याची तक्रार करणाऱ्या मुलाविरुद्धच पोलिसांनी फेसबुकवर दिशाभूल करणारी पोस्ट टाकल्याबद्दल एफआयआर नोंदवला. मात्र त्याच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
सरकारने गोवंश हत्याबंदीचा निर्णय घेतल्यानंतर चामड्याची बॅग बाळगल्याबद्दल एका रिक्षाचालकाने आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार बरुन कश्यप भुयान याने पोलिसांकडे केली. त्यानंतर त्याने तशी पोस्टही फेसबुकवर टाकली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर पुढील तपास केला असता या तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी फेसबुकवर लोकांची दिशाभूल करणारी पोस्ट टाकल्याने बरुनवरच भारतीय दंडसंहिता कलम १५३ (अ) (समाजामध्ये तणाव निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला. तसेच सरकारी यंत्रणेला नाहक त्रास दिल्याबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासही सुरुवात केली.
एफआयआर व कायदेशीर कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी बरुनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.
याचिकाकर्त्याविरुद्ध आयपीसी कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पोलिसांना पुढील कारवाई न करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)