आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 12:45 PM2019-12-22T12:45:59+5:302019-12-22T12:49:50+5:30
आम्हाला मुख्य महामार्ग आणि त्याला लागून असलेले सर्व्हिस रोड खडेमुक्त हवे आहेत.
सातारा: पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था दूर न केल्याने भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 18 डिसेंबर रोजी आनेवाडी टोल नाका बंद पाडला होता. या आंदेलनप्रकरणी शिवेंद्रराजे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे पालन न केल्यामुळे आज भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यातून प्रवास करताना सामान्याचे होणारे हाल याविषयी आमदार शिवेंद्रराजे यांनी विविध स्तरावर पत्रव्यवहार आणि भेटी घेऊन प्रशासनाकडे दाद मागितली होती. गत महिन्यात याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन, महामार्ग प्राधिकरण आणि रिलान्सच्या अधिकाऱ्यांनी वेळ मागून घेतली होती. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याचा निषेधार्थ शिवेंद्रराजे यांनी आंदोलन केले होते.
आम्हाला मुख्य महामार्ग आणि त्याला लागून असलेले सर्व्हिस रोड खडेमुक्त हवे आहेत. तसेच महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी. येत्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला होता.