बँक आॅफ इंडियाच्या इमारतीला आग
By admin | Published: April 22, 2017 01:53 AM2017-04-22T01:53:10+5:302017-04-22T01:53:10+5:30
मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक आॅफ इंडियाच्या इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. इमारतीत दोन-तीन स्फोट झाल्याने, आसपासच्या परिसरातही घबराट पसरली.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक आॅफ इंडियाच्या इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. इमारतीत दोन-तीन स्फोट झाल्याने, आसपासच्या परिसरातही घबराट पसरली. कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी वेळीच इमारतीबाहेर धाव घेतल्याने, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फोर्ट परिसरात महत्त्वाच्या इमारती आहेत. उच्च न्यायालयासमोरील बँक आॅफ इंडियाच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कॉर्पोरेट कार्यालयातून शुक्रवारी संध्याकाळी ४.४० च्या सुमारास धूर निघू लागला. काही वेळाने दोन-तीन सिलिंडरचे स्फोट झाले. या वेळी इमारतीत ४०० कर्मचारी, तर चौथ्या मजल्यावर ८० कर्मचारी होते. आगीचा भडका उडताच फायर अलार्म वाजू लागल्याने कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. सर्व कर्मचारी व ग्राहक इमारतीबाहेर सुखरूप बाहेर पडले. या आगीमुळे पूर्ण फोर्ट परिसरात धूर पसरल्याने भीतीने आजूबाजूच्या इमारतीतील नागरिकांनीही इमारतीबाहेर धाव घेतली. येथील स्टँडर्ड चार्टर्ड बँक, एचएसबीसीच्या बँकही रिकाम्या करण्यात आल्या. ही इमारत उच्च न्यायालयासमोरच असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही होता. आगीची माहिती मिळताच, आगीचे चार बंब व तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत, दीड ते दोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. वातानुकूलित यंत्राच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने, ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)