अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर शहीद

By admin | Published: May 25, 2015 04:18 AM2015-05-25T04:18:25+5:302015-05-25T04:18:25+5:30

काळबादेवी येथील गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झालेले अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे अखेर रविवारी ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये निधन झाले.

Fire brigade chief Sunil Nesarekar martyr | अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर शहीद

अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर शहीद

Next

मुंबई : काळबादेवी येथील गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झालेले अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांचे अखेर रविवारी ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये निधन झाले. नेसरीकर यांच्या निधनाने अग्निशमन दलाने आणखी एक मोहरा गमावला असून, यापूर्वी याच दुर्घटनेतील अग्निशमन दलाचे अधिकारी संजय राणे, महेंद्र देसाई आणि सुधीर अमीन यांनाही प्राण गमवावे लागले होते.
९ मे रोजी गोकूळ हाऊस इमारतीला लागलेल्या आगीत सुनील नेसरीकर हे पन्नास टक्के भाजले होते. ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. संसर्गाचा धोका टळावा म्हणून तातडीने त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर पायावर त्वचारोपण करण्याची शस्त्रक्रियाही पार पडली होती. या उपचारादरम्यान नेसरीकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नॅशनल बर्न सेंटरने प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या सर्व शस्त्रक्रिया निष्फळ ठरल्या. एकापाठोपाठ एक सर्वच अवयव निकामी होत गेल्याने अखेर रविवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, असे सेंटरने स्पष्ट केले आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता भायखळा येथील अग्निशमन दल मुख्यालयाच्या प्रांगणात सुनील नेसरीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. या वेळी त्यांना मानवंदना देण्यात येईल आणि त्यानंतर दुपारी १२ वाजता चंदनवाडी वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान, नेसरीकर यांच्या पश्चात आई, पत्नी जयश्री आणि मुलगा सिद्धांत असे कुटुंब आहे. (प्रतिनिधी)
फायर फायटर हरपला!
सुनील नेसरीकर यांची फायर फायटर अशी ओळख होती. गतवर्षी अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीत जवान नितीन इवलेकर यांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जवान अडकले होते. तेव्हा अग्निशमन दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी आदेश वर्मा यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर सुनील नेसरीकर यांच्यावर कार्यभार सोपविण्यात आला होता. नेसरीकर हे स्वत: एक उत्तम फायर फायटर होते. आग विझविण्यासाठी ते स्वत: आघाडीवर असत, अशी त्यांची ख्याती होती. एक जिगरबाज आणि मितभाषी अशी त्यांची ओळख होती.

Web Title: Fire brigade chief Sunil Nesarekar martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.