रेल्वेने अग्निशमन विभागच केला बंद

By Admin | Published: November 7, 2014 12:43 AM2014-11-07T00:43:12+5:302014-11-07T00:43:12+5:30

भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

Fire brigade closed by rail | रेल्वेने अग्निशमन विभागच केला बंद

रेल्वेने अग्निशमन विभागच केला बंद

googlenewsNext

धोक्याची बाब : कशी होईल प्रवाशांची सुरक्षा?
नागपूर : भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. चक्क अग्निशमन विभागच हरविल्याने रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात आग लागल्यास ती विझविणार कोण? हा गंभीर प्रश्न असून यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या चालू तिकीट कार्यालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानीची घटना घडली नाही. भारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून रेल्वेत लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग अस्तित्वात होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची रेल्वेगाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी रेल्वेत स्वतंत्र विभागच अस्तित्वात नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण होते. (प्रतिनिधी)
अख्खे रेल्वेस्थानक खाक होण्याची भीती
नागपूर रेल्वेस्थानकावर अनेकदा पेट्रोलने भरलेल्या बंबाच्या मालगाड्या उभ्या राहतात. एखाद्या प्रसंगी शॉट सर्किटमुळे आग लागल्यास आणि या पेट्रोलच्या मोठमोठ्या बंबांनी पेट घेतल्यास अख्खे रेल्वेस्थानकच जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोलच्या बंबासह अनेकदा दगडी कोळशाने भरलेल्या मालगाड्याही रेल्वेस्थानकावर उभ्या राहतात. त्यामुळे आग लागल्यास प्लॅटफॉर्मवर आग विझविण्यासाठी कुठलेच उपकरण नसल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध विभागात लावलेली अग्निशमन उपकरणे प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांना हाताळता येत नाहीत उपकरण
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही कार्यालयात रेल्वेने अग्निशमन उपकरणे लावली आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांना ही उपकरणेच कशी हाताळावी याचे ज्ञान नसल्यामुळे आग लागल्यास आणि अग्निशमन उपकरण असूनही त्याचा काहीच लाभ न होण्याची शक्यता आहे. माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी नागपूरचा दौरा केला असताना त्यांनी बेस किचनला भेट दिली. तेथे स्वयंपाक तयार करणाऱ्या एका कामगाराला त्यांनी अग्निशमन उपकरण हाताळून दाखविण्याची मागणी केली. मात्र आपल्याला ते कसे हाताळावे याची माहिती नसल्याचे या कामगाराने सांगितल्यानंतर ते चांगलेच संतापले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे.

Web Title: Fire brigade closed by rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.