जवान ऐकू शकणार ''त्या'' जीवांची आर्त हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 02:32 PM2019-07-11T14:32:25+5:302019-07-11T14:37:35+5:30
पाण्यात बुडालेल्या , ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांची वाचविण्याची आर्त हाक अग्निशामक विभागाच्या जवानांना ऐकता येणार आहे.
योगेश्वर माडगूळकर-
पिंपरी : शहरात इमारत पडली, त्याखाली कोणी अडकले, त्यातील काही लोक ढिगाऱ्याखाली जिवंत असतील, तर त्यांचा जीव वाचविण्याची आर्त हाक अग्निशामक विभागाच्या जवानांना ऐकता येणार आहे. एवढेच नव्हे तर जवान त्या माणसांना आम्ही वाचविण्याचा प्रयत्न करतोय, घाबरू नका, असा संदेश देऊ शकणार आहेत. इतकेच नव्हे तर पाण्याखाली बुडालेल्या व्यक्तीचे नेमके ठिकाणही जवानांना शोधता येणे शक्य होणार आहे, ही किमया आहे अग्निशामक विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या 'पाण्याखालील शोध कॅमेरा' या उपकरणाची. हे उपकरण मुंबईतील एका कंपनीने तयार केले आहे. महापालिकेत हे यंत्र प्रायोगिक तत्त्वावर दाखल झाले आहे.
याबाबत माहिती देताना अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी किरण गावडे म्हणाले, या यंत्राचा वापर करून पाण्याखाली बुडालेल्या व्यक्तीचे नेमकं ठिकाण शोधता येते. या कॅमेऱ्याची क्षमता २ मेगा फिक्सल आहे. त्याला वायर आहे. तसेच रात्रीच्या वेळी परिस्थिती हातळण्यासाठी एलईडी लाईटची व्यवस्था आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही शोधकार्य करता येईल. या उपकरणाला डीव्हीआर युनिट आहे. त्याला एलईडी स्क्रीन आहे. त्यासोबत पन्नास मीटर वायर आहे. त्यामुळे इतर जवानांना पाण्याखालील परिस्थिती दिसणार आहे. या उपकरणाचा विहिरीच्या ठिकाणी प्रभावीपणे वापर करता येणार आहे.
या कॅमेऱ्याचा वापर इमारत पडण्यासारखी दुर्घटना घडल्यास करता येणार आहे. ढिगाऱ्याखाली छोटसे छिद्र पाडून आतमध्ये कॅमेरा सोडता येतो. या कॅमेऱ्याला हेडफोन लावता येतात. तसेच एअर फोन ही असतो. त्यामुळे दुर्घटनेमध्ये नेमका माणूस
कुठे अडकला आहे. तो जिवंत आहे का, त्याचा आवाज ही पथकाला ऐकता येणार आहे. तसेच स्टेटस्कोपच्या माध्यमातून त्याचा श्वासोच्छवास सुरू आहे का ते कळणार आहे़. ऑडिओच्या माध्यामातून पथकातील कर्मचारी त्याच्याशी संवाद साधू शकणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व टॅबवरतीही शेअर करता येणार आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी आलेल्यांना हे दृश्य पाहता येणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.
* पवना नदीत उडी मारल्याने एक तरुण बुडाला. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारला ही घटना घडली होती. या घटनेमध्ये मृताचा शोध घेण्यासाठी या यंत्राचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या यंत्राच्या साह्याने जवान मृताचा शोध घेत आहेत.