वर्ध्यातील केंद्रीय दारूगोळा भांडारात अग्नितांडव 16 शहीद 19 गंभीर
By admin | Published: June 1, 2016 04:53 AM2016-06-01T04:53:11+5:302016-06-01T04:53:11+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठे समजले जाणारे पुलगावचे केंद्रीय दारूगोळा भांडार (सीएडी कॅम्प) सात हजार एकरात पसरले असून, अल्फा, ब्रेव्हो, चार्ली आणि डेल्टा अशा चार सब डेपोत त्याचा विस्तार आहे.
नरेश डोंगरे / राजेश भोजेकर/ प्रभाकर शाहाकार , पुलगाव (जि. वर्धा)
आशिया खंडातील सर्वात मोठे समजले जाणारे पुलगावचे केंद्रीय दारूगोळा भांडार (सीएडी कॅम्प) सात हजार एकरात पसरले असून, अल्फा, ब्रेव्हो, चार्ली आणि डेल्टा अशा चार सब डेपोत त्याचा विस्तार आहे. सीएडी कॅम्पचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेला पुलगाव शहराच्या मुख्य रस्त्यालगत असून, डेल्टा सब डेपोची सीमा दक्षिण दिशेला आगरगावपासून ५०० मीटर अंतरावर आहे. बाजूला पिपरी (खराबे) गेट (चौकी) आहे. हे कोठार नागपूरपासून ११२ किमी, तर वर्धा जिल्हा मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर आहे. या भांडारात चांदा आयुध निर्माणी आणि बोलंगीर येथे निर्मित दारूगोळा साठविण्यात येतो.
....तर मोठा अनर्थ घडला असता
आगीने कॅम्पला विळखा घातल्याचे लक्षात येताच, सीएडीच्या अधिकाऱ्यांनी खंदकात सुरक्षित ठेवलेल्या बॉम्बपर्यंत आगीची तीव्रता पोहोचू नये, म्हणून चक्क मृत्यूशी सामना केला. सीएडीचे दोन अग्निशमन दल तातडीने आग विझविण्यासाठी धावले. आगीने दोन किलोमीटरचे क्षेत्रफळ कवेत घेतले होते. खंदकातील बॉम्बला झळ लागल्यास संपूर्ण देवळी तालुक्यातील शेकडो लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, ही कल्पना आल्यामुळे लेफ्टनंट कर्नल रंजित पवार आणि मेजर बी. मनोजकुमार आपल्या सहकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांना घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करू लागले. अचानक बॉम्बचा स्फोट झाला. त्याची तीव्रता एवढी होती की, स्फोटामुळे अग्निशमन दलाची दोन्ही वाहने फुटबॉलसारखी हवेत उंच उडाली. यात सैन्य दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जण शहीद झाले, तर १९ जण गंभीर जखमी झाले. अशाही स्थितीत उपरोक्त अधिकारी आणि जवानांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ६ तास आगीशी झुंज देत, मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान नियंत्रण मिळविले. सर्व जखमींना सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
भारतीय लष्कराच्या पुलगाव (जि. वर्धा) येथील दारूगोळा भांडारात आग लागून झालेल्या भीषण स्फोटांत सैन्य दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जण शहीद झाले, तर १९ जण गंभीर जखमी आहेत. सोमवारी मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे स्फोट इतके भीषण होते की, पंचक्रोशीतील अनेक गावांमधील घरे हादरली. त्यामुळे लोक गाव सोडून सैरावैरा धावत सुटले.
सहवेदना... पाच दिवसांच्या
मोरोक्को, ट्युनिशिया दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीदेखील पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारातील घटनेतील जवानांच्या मृत्यूवर अतीव दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी, तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
लष्कराला धक्का...या घटनेने सेना प्रशासनाला प्रचंड हादरा बसला आहे. एवढ्या मोठ्या संख्येत सीएडीतील अधिकारी आणि जवान शहीद झाल्याचे कळल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लष्करप्रमुख मेजर जनरल दलबीरसिंग यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले, तसेच मंगळवारी दुपारी पर्रिकर यांनी सीएडी कॅम्प गाठले.
कोर्ट आॅफ इन्क्वायरीचे आदेश... पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात आग नेमकी कशामुळे लागली, घातपात तर झाला नाही ना आदी विविध कारणांचा शोध घेण्यासाठी सैन्य दलाने कोर्ट आॅफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. शिवाय विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमली असून, ही समिती घटनेतील बारकावे शोधून, अहवाल संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे सादर करणार आहे.शहीद : स्फोटात कर्नल पवार, मेजर मनोजकुमार, तसेच अग्निशमन दलाचे
बाळू पाखरे, अमित दांडेकर, किसनकुमार, बी.के. यादव, नवज्योतसिंग, अमोल येसनकर, चोपडे, अमित पुनिया यांच्यासह १६ जण कर्तव्यावर शहीद झाले आहेत.जखमी : प्रदीपकुमार मुन्शीरान, राजेंद्र महाजन, नेत्रपाल रनसिंग, संतोष पाटील, शाज कुमार, सतीश गोवावकर, दीपक शिंदे, राम नामदेवराव वनकर, ललित कुमार, बच्चन सिंग, गजेंद्र सिंग, शिवेंद्र त्रिपाठी, जगदीश चंद्र, स्वप्निल रमेश खुरगे, लोकेश, शरद यादव, के.एम. साहू, बाबाराव महादेव आणि उमाकांत प्रदीप आदी गंभीर जखमी झाले आहेत..