फटाके फोडून पेटवले घर, मजुराचा मृत्यू!
By admin | Published: March 13, 2016 01:59 AM2016-03-13T01:59:54+5:302016-03-13T01:59:54+5:30
अकोला येथील घटना; कर्जामुळे होता घरगुती कलह
अकोला - खोलेश्वर परिसरात घराला लागलेल्या भीषण आगीत घरमालक जागेवरच जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. घनशाम पाटनकर हे मृताचे नाव असून, त्यांनी घरामध्ये फटाके फोडून आग लावल्याची माहिती समोर आली आहे.
खोलेश्वर परिसरातील रहिवासी, हातमजुरी करणारे घनशाम सुखदेवराव पाटनकर (४३) यांच्यावर सावकारी कर्जाचा मोठा डोंगर आहे. या कर्जामुळे कौटुंबिक वादविवाद सुरु झाले. पती-पत्नीच्या वादात मुलांचीही फरपट होत असल्याने त्यांची पत्नी मुलांसोबत कधी खदान परिसरातील माहेरी राहायची, तर कधी पतीकडे. या परिस्थितीमुळे पाटनकर यांना दारुचे व्यसन लागले. या सर्व व्यापातून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले. शुक्रवारी त्यांची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली, तर भाऊ कुटुंबीयांसह नागपूर येथे गेले होते. घनशाम पाटनकर रात्री घरी एकटेच असताना, त्यांनी फटाके फोडून घराला आग लावली. त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात संपूर्ण घर जळून पाटनकर हेदेखील आगीच्या विळख्यात सापडले. या आगीमध्ये होरपळून पाटनकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांनी आरडा-ओरड केली; मात्र शेजारी मंडळी आणि अग्नीशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविण्यापूर्वीच पाटनकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. अग्नीशमन विभागानेही आगीवर नियंत्रण मिळविले. पाटनकर यांचा संपूर्ण जळालेला मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. आगीच्या दुर्घटनेमुळे कुटुंबाला काही शासकीय मदत मिळणे शक्य होईल, या विचारातून त्यांनी घराला आग लावल्याची चर्चा परिसरात होती.