फोर्टमध्ये इमारतीला आग
By Admin | Published: April 29, 2016 03:11 AM2016-04-29T03:11:16+5:302016-04-29T03:11:16+5:30
हरीश चेंबर इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर टीपीए सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गाळ्याला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली.
मुंबई : फोर्ट येथील शहीद भगतसिंग मार्गावरील हरीश चेंबर इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर टीपीए सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गाळ्याला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. या आगीत जखमी झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी तानाजी चेंदू यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र सकाळी लागलेल्या या आगीमुळे शहीद भगतसिंग मार्गावर झालेली वाहतूककोंडी दुपारपर्यंत कायम होती.
हरीश चेंबर ही चार मजली इमारत आहे. सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचा भडका उडाल्याने आणि वायुविजन होत नसल्याने जवानांना आग विझवण्यात अडथळे येत होते. धुराने लगतच्या परिसरावर ताबा मिळवला होता. बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
एमआरए पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी यासंदर्भात सांगितले, या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र घटनास्थळी पाणी असल्याने येथील पंचनामा करण्यात आलेला नाही. संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले असून, शुक्रवारी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येईल. तर महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती. (प्रतिनिधी)