जालना रोडवरील कापड दुकानाला आग
By Admin | Published: July 2, 2017 12:36 PM2017-07-02T12:36:22+5:302017-07-02T12:36:22+5:30
जालना रोडवरील पाटीदार भवन येथील साजन-सरिता एनएक्स या साडीच्या दुकानाला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 2 - जालना रोडवरील पाटीदार भवन येथील साजन-सरिता एनएक्स या साडीच्या दुकानाला रविवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत दुकानातील फर्निचर, किंमती साड्या आणि विद्युत वायरिंगचे नुकसान झाले. नुकसानीच्या अचूक आकडा स्पष्ट होऊ शकला नाही.
जालना रोडवरील साजन सरिता एनएक्स या साड्यांच्या दुकानातून रविवारी सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास धूर निघू लागला. पावणे दहा दुकानाशेजारील लोक आणि अमरप्रीत चौकाकडून मोंढा नाकाकडे जाणा-या वाहनचालकांनी ही घटना पाहिली. याघटनेची माहिती अग्निशमन दल आणि क्रांतीचौक पोलिसांना देण्यात आली. अग्निशनम दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानदार आणि तेथील कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा दुकानात धूर कोंडला होता.धूर बाहेर निघण्यास विलंब लागत असल्याने आग कोठे लागली हे जवानांना दिसत नव्हते. शेवटी धूराचा मार्ग मोकळा करण्यासाठी काचा फोडण्यात आल्या. काचा फोडल्यानंतर धूर बाहेर पडल्यानंतर जवानांनी आत जाऊन पाण्याचा मारा केला. अर्धा ते पाऊण तासात आग नियंत्रणात आणली. या घटनेत फर्निचर जळून किंमती साड्या आणि विद्युत वायरिंगचे, इन्व्हर्टर जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवांनांनी सांगितले. या घटनेतील नुकसानीची आकडेमोड दुकानमालकांकडून सुरू होती. यावेळी अग्निशमन दलाचे ज्ञानेश्वर साळुंके, अब्दुल अजीज, विनायक लिमकर, वाहनचालक सुभाष दुधे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक धर्मराज देशमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.