कोल्ड स्टोरेजला आग
By Admin | Published: September 21, 2016 03:14 AM2016-09-21T03:14:12+5:302016-09-21T03:14:12+5:30
ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील फ्रोस्ट कोल्ड स्टोरेजला मंगळवारी पहाटे आग लागली.
नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील फ्रोस्ट कोल्ड स्टोरेजला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीमध्ये दोन मजले जळून खाक झाले असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
एमआयडीसीत रबाळे येथील भूखंड क्रमांक आर ९०३ वर फ्रोस्ट कोल्ड स्टोरेज आहे. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील गोडावूनमधून धूर येत असल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. तत्काळ याविषयी अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी, पनवेल, तळोजामधील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहचून आग विझविण्यास सुरवात केली. परंतु तोपर्यंत येथील दोन मजल्यावरील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते. कोल्ड स्टोरेजमध्ये मसाल्याचे पदार्थ, शेंगदाणे व इतर अन्नधान्याचे पदार्थ साठवून ठेवले होते. आगीमुळे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजले नसून शार्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.