सदोष वायरिंगमुळे लागली आग
By admin | Published: February 25, 2016 03:03 AM2016-02-25T03:03:36+5:302016-02-25T03:03:36+5:30
सदोष वायरिंगमुळे गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात आगीचा भडका उडाला. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली
मुंबई: सदोष वायरिंगमुळे गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात आगीचा भडका उडाला. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली असल्याने ही आग वेगाने पसरल्याचा ठपका अग्निशमन दलाने पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांना सादर केलेल्या आपल्या अहवालात ठेवला आहे़ या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रिज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विजक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेन्मेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले असले,
तरी त्यांच्यावर कारवाईबाबत मात्र,
या अहवालात मौन बाळगण्यात
आले आहे़
‘मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत ‘महाराष्ट्र रजनी’चा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आला होता़ या सोहळ्यात नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना, अचानक स्टेजखालून आगीचा भडका उडाला़ अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत, ही आग विझविली़ मात्र, यात कोट्यवधी रुपयांचे सामान जळून खाक झाले़ या आगीमागे षड्यंत्र असल्याचे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले़ त्यानुसार, दहा दिवसांनी १४२ पानांचा अहवाल आज सादर झाला़
१३ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे फायर आॅडिट करताना, एल़पी़ गॅस सिलिंडर्सच्या वापरास लेखी मनाई करण्यात आली होती, याकडे अग्निमशन दलाने लक्ष वेधले आहे़, तसेच स्टेजजवळच मोठ्या प्रमाणात सिलिंडर्सचा साठा करण्यात आला होता़ एवढेच नव्हे, तर ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली केल्याने, या
दुर्घटनेला आयोजकांनी आयते आमंत्रणच दिल्याचे, या अहवालातून अग्निशमन दलाने निदर्शनास आणले आहे़ (प्रतिनिधी)
...अडचणी वाढत गेल्या
अग्निशमन केंद्राचे अधिकारी व जवान साधनांसह हजर होते़ स्टेजला आग लागल्याचे दिसताच, त्यांनी मदतकार्यही सुरू केले़, परंतु तेथे असलेल्या अति ज्वलनशील वस्तूंच्या साठ्यामुळे आग वेगाने पसरत गेली़ यामुळे अग्निशमन दलाच्या अडचणी वाढल्या.
आगप्रकरणात विझक्राफ्टला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. सरकारी निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत, चौपाटीवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने सरकारच दोषी आहे.
- संजय निरुपम, मुंबई अध्यक्ष, काँग्रेस