शॉर्टसर्कीटमुळे आग; ९ घरे भस्मसात
By admin | Published: March 11, 2016 03:08 AM2016-03-11T03:08:32+5:302016-03-11T03:08:32+5:30
अकोला जिल्ह्यातील घटना; लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज.
मूर्तिजापूर /कुरुम (अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी (बपोरी) गावाशेजारच्या वस्तीत गुरुवार, १0 मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत नऊ घरे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोनोरी (बपोरी) या गावाला लागूनच वस्ती आहे. या वस्तीत दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने भीषण रूप धारण केले. आगीत एका पाठोपाठ एक अशी नऊ घरे जळून खाक झाली. या घरांमधील अन्नधान्य, भांडी-कुंडी, कपडे यासह सर्व साहित्य जळून खाक झाले. अचानक ओढवलेल्या या संकटाने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर आले आहेत. या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. आगीची वार्ता पसरताच गावकर्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. गावकर्यांनी शर्थीचे प्रयत्न करून, आग आटोक्यात आणली. तोपर्यंत नऊ घरांची राखरांगोळी झाली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
अग्निशामक दलाचे वरातीमागून घोडे
गावात भीषण आग लागल्यानंतर सर्वत्र हाहाकार उडाला होता. नागरिकांनी याबाबत मूर्तिजापूर येथील अग्निशामक दलास माहिती दिली; परंतु अग्निशामक दलाचे वाहन पोहोचण्यास बराच विलंब झाला. तोपर्यंत ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून, आग पूर्णत: विझवली होती.