सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत आगीचे तांडव

By admin | Published: September 14, 2014 01:11 AM2014-09-14T01:11:15+5:302014-09-14T01:11:15+5:30

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार

Fire Hazards in Sinala underground coal mine | सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत आगीचे तांडव

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत आगीचे तांडव

Next

कोट्यवधीची हानी : विषारी वायूने ५५ कामगार बेशुद्ध
चंद्रपूर : सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार बेशुद्धावस्थेत अडकून पडले होते. मात्र वेळीच सहकाऱ्यांनी त्यांंना बाहेर काढल्याने मोठी प्राणहानी टळली. या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारानेच ही घटना घडल्याचा आरोप होत असून कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीलगतच सिनाळा भूमिगत कोळसा खाण आहे. शुक्रवारी रात्रपाळीत पहाटे ४ वाजताच्या सुमारास या खाणीत अचानक आग लागली. सुरुवातीला ही आग कमी प्रमाणात होती. नंतर हळूहळू आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान, या आगीबाबत सुशील गोंडाणे या कामगाराने खाण प्रबंधक एस.एस. तकलक यांना माहिती दिली. मात्र गंभीर बाब ही की, आगीच्या या घटनेकडे येथील उपक्षेत्रीय प्रबंधक ए.सी. हलदर, खाण अधीक्षक संजू मिश्रा यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे, तर खाणीत आग लागली असताना जनरल शिफ्टच्या १०० कामगारांना खाणीत काम करण्यासाठी जबरदस्तीने उतरविले, असा कामगारांचा आरोप आहे. खाणीत ३४० मीटर खोलवर ही आग लागली होती. आग लागली तेव्हा खाणीत १५० कर्मचारी काम करीत होते. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत मोठ्या प्रमाणात कोळसा जळत असल्याने त्यातून कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी वायू उत्सर्जित होऊन तो सर्वत्र पसरला. याचवेळी एक्झास्ट फॅन अर्धा ते पाऊण तास बंद होता. वीज पुरवठाही खंडीत झाल्याने कोळसा ज्वलनातून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार घटनास्थळावरच बेशुद्ध झाले. ही बाब लक्षात येताच, काही कामगारांनी प्रसंगावधान राखत बेशुद्ध झालेल्या कामगारांना कसेबसे खाणीबाहेर काढले. त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. बेशुद्ध झालेल्या कामगारांना लगेच वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील काही कामगार चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कामगारांची प्रकृृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
खाणीतील आग अद्याप आटोक्यात आली नसून खाणीतील कोळसा सतत जळत आहे. घटनास्थळावर वीज केंद्राच्या अग्निशमन दलाचे एक वाहन आले. मात्र ही आग २५० ते ३०० मीटर खोल भागात असल्याने आगीवर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही. या आगीत कोट्यवधी रुपयांचा कोळसा जळून राख झाला असून तो अद्यापही जळतच आहे. खाणीच्या आत सर्वत्र कार्बन मोनॉक्साईट पसरल्याने आत जाऊन आग विझविणे कठीण झाले आहे. दरम्यान, खासदार हंसराज अहीर यांनी दुपारी आगग्रस्त खाणीला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. आगीनंतर रेस्क्यू आॅपरेशन राबवून कामगारांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. त्यांना वेकोलिकडून सन्मानित करण्याच्या सूचना खा. अहीर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. घटनास्थळावर वेकोलिचे मुख्यमहाप्रबंधक आर.के. मिश्रा, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भूजबळ, दुर्गापूरचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Fire Hazards in Sinala underground coal mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.