कुलाब्यात मेट्रो हाऊस इमारतीला लागलेली आग भडकली
By admin | Published: June 2, 2016 04:58 PM2016-06-02T16:58:44+5:302016-06-02T21:01:50+5:30
कुलाब्यातील रिगल थिएटरजवळच्या इमारतीला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - दक्षिण मुंबईतल्या कुलाब्यातील रिगल थिएटरजवळ असलेल्या मेट्रो हाऊस इमारतीला लागलेली भीषण आग पुन्हा भडकली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या आणि ११ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पाण्याचे टँकर न पोहोचल्यानं अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी येत आहेत.
सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तीन तास उलटूनही अजून आग धुमसतेच आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ही आग लागली असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कुलाब्यातील मेट्रो हाऊस परिसरातील रिगल सिनेमाजवळ ही इमारत आहे. तसेच, या परिसरातच प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफे असून, त्याच्या बाजूलाच आमदार निवासही आहे.
मेट्रो हाऊस इमारत रिकामी करून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी दोन अँम्बुलन्सही दाखल झाल्या आहेत. कुलाबा हा परिसर रहदारीचा असून, आगीनंतर इथली गर्दी आणखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी अतिदक्षतेचा उपाय म्हणून रिगल जवळ नाकाबंदी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त केला आहे.
दरम्यान, पाण्याअभावी आग विझविण्यास उशिर होत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केला आहे. आग विझविण्यासाठी फायर हायडृंटमधून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.