औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयास आग
By admin | Published: June 9, 2016 01:53 AM2016-06-09T01:53:25+5:302016-06-09T01:53:25+5:30
बोरीभडक (ता. दौंड) येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयास आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले
यवत : बोरीभडक (ता. दौंड) येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयास आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही घटना काल (दि. ७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
औद्योगिक केंद्राचे प्रभारी प्राचार्य संजय वाळुंज यांनी दिलेली अधिक माहिती अशी : मंगळवारी (दि. ७) रात्री साडेनऊ वाजता कार्यालयास आग लागल्याचे कळताच, आम्ही तेथे धाव घेऊन प्रथम वीजपुरवठा बंद केला. अग्निशमन दल पुणे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आगीचा बंब बोलावला. दरम्यान, औद्योगिक केंद्रात असणारी अग्निशमन यंत्रणा वापरून तसेच पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग शेजारील रूममध्ये पसरून नुकसान होऊ नये, म्हणून रूम मोकळ्या केल्या. तसेच रूमच्या कार्यालयाबाहेर असलेली मारुती झेन गाडी दूर नेऊन लावली. काही वेळाने अग्निशमन दलाची गाडी आल्याने आग विझविण्याचे काम जोरदारपणे सुरू केल्याने रात्री १ वाजण्याच्यादरम्यान आग आटोक्यात आली. आगीमध्ये कार्यालयातील टेबल, खुर्च्या, फर्निचर, लोखंडी कपाटे यामधील कागदपत्रे, पाच संगणक, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशीन, वातानुकूलित यंत्रणा यांसह कपाटातील ५०० मुलांचे सन २००७ पासून ते आजअखेरपर्यंतची ओरिजनल कागदपत्रे, निकालपत्रे, व्यवसाय उत्तीर्ण प्रमाणपत्रे, केंद्राला मिळालेल्या विविध व्यवसाय सुरू करण्यास मिळालेली मंजुरीपत्रे, औद्योगिक केंद्राचा संस्था आणि शासन यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे, शिक्षकांची सेवापुस्तके, पर्सनल फाईल, कॅशियरच्या कपाटात असलेले रोख २० हजार रुपये आदी सर्व जळून खाक झाले.
>आगीचे वृत्त कळताच आज (दि. ८) सकाळी १० वाजता आॅल इंडिया
श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे संस्थेचे मानद सचिव छत्रपती मालोजीराजे, खजिनदार अजय पाटील, मानद सहसचिव संजय शिंदे यांनी औद्योगिक केंद्रास भेट देऊन जळिताची पाहणी केली. कार्यालयात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमुळे कोणतीही अडचण होणार नाही व यामुळे शैक्षणिक अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे छत्रपती मालोजीराजे यांनी सूचित केले.