द. मुंबईतील जुन्या इमारतींवर ‘अग्निसंकट’
By admin | Published: May 12, 2015 02:36 AM2015-05-12T02:36:37+5:302015-05-12T02:36:37+5:30
काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या तोकड्या यंत्रणेविषयी गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे़ अपुरे मनुष्यबळ
शेफाली परब-पंडित, मुंबई
काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या तोकड्या यंत्रणेविषयी गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे़ अपुरे मनुष्यबळ व अद्ययावत साधनांच्या अभावामुळे जवानांची सुरक्षा धोक्यात आहे, ही बाब सातत्याने समोर येत आहे़ त्यातच अग्निरोधक यंत्रणेचा भार पेलू न शकणाऱ्या दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त हजारो धोकादायक इमारतींचा प्रश्नही या दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला आहे़
दक्षिण मुंबईतील बहुतांशी जुन्या इमारती एकमेकांना खेटून उभ्या असून, तेथील मार्गही अरुंद आहेत़ काळबादेवी येथील दुर्घटनाग्रस्त गोकूळ निवासच्या मदतकार्यातही याच चिंचोळ्या मार्गाची अडचण निर्माण झाली होती़ येथील इमारती खेटून उभ्या असल्याने गोकूळ निवासला भस्मसात करणाऱ्या आगीच्या झळा आसपासच्या इमारतींनाही बसल्या. त्यामुळे त्या इमारतींच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे़
जानेवारी २०१५मध्ये नागपाडा येथील जुन्या इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला होता़ १९८० पूर्वीच्या अशा सुमारे १६ हजार उपकरप्राप्त इमारती शहरात आहेत़ ५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्र, फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टरसारखी मूलभूत यंत्रणाही नाही. त्यामुळे आग लागू नये, याची खबरदारी घेणे ऐवढेच या इमारतींमधील लाखो रहिवाशांच्या हाती आहे़