अग्निशमन केंद्रांना टाळे?
By admin | Published: June 5, 2017 03:25 AM2017-06-05T03:25:59+5:302017-06-05T03:25:59+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाची ‘ड’ प्रभाग आणि ‘ह’ प्रभाग कार्यालयांतील केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बंद करण्यात येणार आहेत.
प्रशांत माने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाची ‘ड’ प्रभाग आणि ‘ह’ प्रभाग कार्यालयांतील केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बंद करण्यात येणार आहेत. अग्निशमन दलानेही त्याला दुजोरा दिला आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही केंद्रे चालवणे जिकिरीचे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या अन्य विभागांप्रमाणे अतिमहत्त्वाच्या अशा अग्निशमन दलासाठीही डोकेदुखी ठरत आहे. केडीएमसीच्या अग्निशमन दलासाठी अधिकारी आणि कर्मचारी, अशा मिळून २२८ पदांना सरकारची मान्यता आहे. फायरमनची १५० पदे मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ ६५ कर्मचारीच कार्यरत आहेत. ड्रायव्हर-कम-आॅपरेटरची ३० पदे मंजूर असताना सध्या १० कर्मचारीच कार्यरत आहेत. लिडिंग फायरमनच्या ३० पदांना मान्यता आहे, पण सध्या १३ जणच या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे एखादी मोठी घटना तसेच आपत्ती ओढवल्यास उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून सेवा पुरवणे तारेवरची कसरत ठरते.
केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दोन वर्षे भरती प्रक्रिया सुरू होती. त्यात ४५ पदांकरिता परीक्षाही घेण्यात आली. तसेच निकालही जाहीर करण्यात आला. परंतु, पुढे त्याची कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नाही. सध्या चार अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांतील लोकसंख्येच्या तुलनेत आठ केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु, उपलब्ध कर्मचारी बळ आणि सामान्य प्रशासन विभागाचे भरती करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता चारपैकी दोन केंद्रे बंद करण्याची वेळ संबंधित विभागावर ओढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
२६ जुलै २००५ च्या प्रलयंकारी महापुराच्या वेळी ओढवलेल्या परिस्थितीवरून डोंबिवली पश्चिमेकडील ‘ह’ प्रभागात, तर कल्याण पूर्वेकडील ‘ड’ प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी अग्निशमन केंद्रे सुरू करण्यात आली. परंतु, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या केंद्रांवर आता गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. डोंबिवली एमआयडीसी आणि कल्याणमधील आधारवाडी ही दोनच प्रमुख केंद्रे चालू ठेवण्याची भूमिका अग्निशमन विभागाने घेतली आहे. त्याबाबत, सामान्य प्रशासन विभागाला सांगण्यात आले आहे. यावर, प्रशासन कोणता निर्णय घेते,याकडे लक्ष लागले आहे.
>नव्या केंद्रात होणाऱ्या स्थलांतराला ब्रेक
डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग कार्यालयातील अग्निशमन केंद्राला १० ते १२ वर्षे झाली आहेत. या कार्यालयानजीकच्या श्रीधर म्हात्रे चौकात नवीन वास्तू उभारण्यात आली आहे. परंतु, केंद्राच्या स्थलांतराला अद्यापपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या केंद्र चालवणे जिकिरीचे झाल्याने नवीन जागेत केंद्र स्थलांतर करून कर्मचारी आणायचे तरी कोठून, असा यक्षप्रश्न अग्निशमन विभागाला पडल्याने स्थलांतराला तूर्तास ब्रेक लागल्याची चर्चा आहे.