भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग; तीन तास आगीचे तांडव, रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:15 PM2021-05-16T23:15:43+5:302021-05-16T23:16:07+5:30

वडाळागावातील अनधिकृत भंगारमालाच्या गुदामाचे माहेरघर असलेल्या महेबूबनगर परिसरातील प्लॅस्टिकच्या भंगारमालाच्या गुदामात रविवारी (दि.16) रात्री आठ वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला.

fire in a scrap yard The fire raged for three hours leaving the residents in a state of shock | भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग; तीन तास आगीचे तांडव, रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

भंगारमालाच्या गोदामाला भीषण आग; तीन तास आगीचे तांडव, रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

googlenewsNext

इंदिरानगर : वडाळागावातील अनधिकृत भंगारमालाच्या गोदामाचे माहेरघर असलेल्या महेबूबनगर परिसरातील प्लॅस्टिकच्या भंगारमालाच्या गोदामात रविवारी (दि.16) रात्री आठ वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. संपूर्ण गुदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. प्लॅस्टिकच्या भंगरमालाचा साठा असल्याने आगीचे तांडव सुरु झाले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

वडाळागावातील महेबूबनगर सादिकनगर, साठेनगर, मदिनानगर या भागांमध्ये भर लोकवस्तीत अनधिकृतपणे बहुतांश भंगाराची गोदामे आहेत. महेबूबनगरच्या गल्ली क्रमांक 4मध्ये असलेल्या इरफान शमशोद्दिन शेख यांच्या मालकीच्या भंगाराच्या गोदामाला आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की द्वारका, इंदिरानगर भागांतून आकाशात आगीच्या ज्वाला भडकल्याचे चित्र दिसत होते. सर्वत्र धावपळ आणि गोंधळ उडाला होता. गोदमाच्या जवळपास असलेल्या रहिवाशांनी तात्काळ आपल्या लहान मुलांना घेऊन सुरक्षित स्थळी धाव घेतली. अनेकांनी घरातील सिलिंडरदेखील सुरक्षितपणे बंद करत बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या शिंगाडा तलाव मुख्यालयासह सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, कोणार्कनगर या सर्व केंद्रातून बंबासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचण्यासाठी प्रमुख असलेले पिंगुळबाग व सादीकनगरचे दोन्ही रस्त्यांची दुर्दशा झाल्याने अग्निशमन दलाच्या बंब चालकांना कसरत करावी लागली. अरुंद गल्लीबोळ, दाट लोकवस्तीचा परिसर आणि शेकडोंच्या संख्येने जमलेली गर्दी अशा सर्व आव्हानांचा सामना करत जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पाण्याचा चौहोबाजूंनी पाण्याचा मारा करत आगीचे तांडव थांबविण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना जवानांची दमछाक झाली. सुमरे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली आणि रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान,  घटनास्थळी आपत्कालीन कार्य करणाऱ्या जवानांचनाही जमावाने शिवीगाळ करत त्यांच्या हातांतून पाण्याचे पाईप हिसकावून घेत स्वतःच्या पद्धतीने आग विझविण्याचा मूर्खपणाही यावेळी काहींनी केला. तसेच वार्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही यावेळी जमलेल्या गर्दीतील काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी दमबाजी करत कॅमेरे, मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शी रहिवाशांनी सांगितले.

Web Title: fire in a scrap yard The fire raged for three hours leaving the residents in a state of shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग