..अन् प्रेताविनाच सरणाला दिला अग्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:54 AM2020-11-20T07:54:24+5:302020-11-20T07:55:48+5:30
आवंढे गावातील घटना : धर्मांतरामुळे वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील आवंढे येथील फुलाई दाभाडे (६५) या महिलेचा वृद्धापकाळाने बुधवारी रात्री मृत्यू झाला. या महिलेला दोन मुले असून मोठा मुलगा सुभाष हिंदू धर्मात, तर पती महादू दाभाडे आणि लहान मुलगा सुदाम दाभाडे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. मोठ्या मुलाने हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आईचा अंत्यविधी करायचे ठरवले, मात्र महिलेचा पती व छोट्या मुलाने ख्रिश्चन धर्मातील रीतीप्रमाणे प्रेताचा दफनविधी करायचे ठरवले.
दोघा भावंडांत मोठा वाद झाल्यामुळे गावकऱ्यांनीही दफनविधी करण्यास विरोध केला. शेवटी पोलिसांनी पतीकडे प्रेत सुपुर्द केल्याने ख्रिश्चन धर्माप्रमाणे वसई येथील पाचुबंदर येथे प्रेताचा दफनविधी करण्यात आला. मात्र मोठ्या मुलाने सरण रचून त्यावर बाहुली ठेवून सरणाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडले. मिळालेल्या माहितीनुसार, आवंढे हे एक आदिवासी लोकवस्ती असलेल्या खेडेगावात महादू दाभाडे यांचे कुटुंब राहते. पत्नी फुलाई (६५), मोठा मुलगा सुभाष व लहान मुलगा सुदाम असे राहतात. महादू, फुलाई व लहान मुलगा सुदाम यांनी खिश्चन धर्म स्वीकारला आहे. बुधवारी रात्री फुलाई हिचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू झाल्याने मोठा मुलगा सुभाष याने हिंदू धर्मातील रिवाजाप्रमाणे आईला अग्नी द्यायचे ठरवले, तर सुदाम याने ख्रिस्ती धर्माप्रमाणे आईचा दफनविधी करण्याचे ठरवले. यावरून दोघामध्ये वाद सुरु झाले.
गावकऱ्यांनीही गावात अंत्यसंस्कार करायचे असतील तर हिंदू धर्माप्रमाणेच करावे लागतील अन्यथा गावाच्या हद्दीत दफनविधी करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. शेवटी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी मृत महिलेच्या पतीशी चर्चा करून पतीच्या इच्छेप्रमाणे दफनविधी करण्याचे ठरले. वसई येथील पाचुबंदर येथे महिलेचा दफनविधी केला . शेवटी मोठ्या मुलाने गावातील स्मशानभूमीत सरण रचून त्यावर बाहुली ठेवून प्रेताविनाच सरणाला अग्नी दिला. या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली असून चर्चेचा विषय बनली आहे.