वरळीत अग्नितांडव

By admin | Published: May 19, 2016 05:55 AM2016-05-19T05:55:23+5:302016-05-19T05:55:23+5:30

वरळीतील मधुसुदन चाळीत बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक झाले.

Fire at the Worli | वरळीत अग्नितांडव

वरळीत अग्नितांडव

Next


मुंबई : वरळीतील मधुसुदन चाळीत बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक झाले. रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. आगीत लाखोंचा ऐवज खाक झाल्याने रहिवाशांना आर्थिक फटका बसला आहे.
वरळी येथील पांडुरंग भुतकर मार्ग परिसरात १०० वर्षे जुनी एकमजली मधुसुदन चाळ आहे. बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास येथील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ८२ मधील गुलशन नट (५५) यांच्या घरात सिलिंडरचा मोठा आवाज आला. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना तेथून दूर होण्यास सांगितले. नट बाहेर पडणार, तोच आगीच्या संपर्कात येत सिलिंडरचा स्फोट झाला.
रहिवासी इमारतीतून खाली उतरेपर्यंत एकामागोमाग एक असे तब्बल ५ ते ६ वेळा आवाज आले. या चाळीला लाकडी आधार असल्याने ही आग वेगाने पेट घेत होती. चाळीतील तरुणांनी खालच्या खोल्यांमधील सिलिंडर बाहेर काढले. त्यात विजेचा मेन स्विचही बंद करण्यात आला. त्यामुळे आग नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. १० ते १२ घरांमधील सामान आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. आगीमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
>...आणि तो वाचला
गुलशन नट यांच्या घरात २५ जण एकत्र राहतात. नातेवाईकांचे लग्न असल्याने नट कुटुंबीय गावी होते. गुलशन त्यांचा सहा वर्षीय नातू आदिल सोबत घरात होते.
घटनेच्या काही वेळापूर्वी आदिल खालच्या खोलीतील शुभांगी चांदणे यांच्या घरी गेला. तो खाली खेळत असताना अचानक मोठा आवाज झाला. चांदणे यांनी आदिलसोबत बाहेर पळ काढला. त्यामुळे तोही यातून बचावल्याचे चांदणे यांनी सांगितले.
सिलिंडरची पळवापळवी : अग्नितांडवादरम्यान तरुणांनी जिवाची पर्वा न करता घरांमधील सिलिंडर बाहेर काढले. हे सिलिंडर दिसेल त्या मोकळ्या जागेत ठेवण्यात येत होते. मात्र, मदतीचा हात पुढे करण्याऐवजी मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेले हे सिलिंडर पळवण्यात आले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Fire at the Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.