‘बर्थडे’साठी गेले अन् गायब झाले, अग्निशमन दल मगरींना घाबरले, मोबाइलच्या प्रकाशात मुलाकडून शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:31 AM2018-07-10T06:31:02+5:302018-07-10T06:31:23+5:30
बर्थडे पार्टीसाठी ५२ वर्षीय संभाजी धोंडू कुळे यांनी मित्रांसोबत पहिल्यांदाच विहार तलाव गाठले. पार्टी सुरू असतानाच, पोहण्यासाठी जातो, असे सांगून ते पुढे गेले आणि दिसेनासे झाले.
मुंबई : बर्थडे पार्टीसाठी ५२ वर्षीय संभाजी धोंडू कुळे यांनी मित्रांसोबत पहिल्यांदाच विहार तलाव गाठले. पार्टी सुरू असतानाच, पोहण्यासाठी जातो, असे सांगून ते पुढे गेले आणि दिसेनासे झाले. घटनेची वर्दी लागताच पोलीस, अग्निशमन दल यांनी घटनास्थळ गाठले. मात्र तलावापर्यंत बोटी पोहोचत नाही, त्यात तलावात मगर असल्याचे सांगून ते पाण्यात उतरले नाहीत. त्यामुळे मुलानेच मित्रांच्या मदतीने वडिलांचा शोध सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत पाहावयास मिळाला.
पवईच्या फिल्टरपाडा परिसरात संभाजी हे पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. ते पार्ले कंपनीत नोकरीला आहेत. रविवारी त्यांचा वाढदिवस होता. बर्थडे पार्टी म्हणून त्यांनी सकाळी मित्रांसोबत विहार तलाव गाठले. पार्टी उरकल्यानंतर त्यांनी मित्रांकडे तलावात पोहण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते पुढे निघाले. काही अंतरानंतर ते दिसेनासे झाले. बराच वेळ झाला तरी ते न परतल्याने मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. ते पाण्यात बुडाले या शक्यतेतून मित्रांनी पोलिसांना कळविले. घटनेची वर्दी लागताच पोलीस तेथे दाखल झाले. सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांकडून माहिती मिळताच, मुलांनी थेट विहार तलाव गाठले.
मुलगा सनी याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला त्यांनी मुलुंडच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र हद्द मरोळ अग्निशमन विभागाची येते, असे सांगून ते निघून गेले. काही वेळाने पोलीसही निघून गेले.
सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मरोळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. ते साडेअकराच्या सुमारास तलावाकडे आले. मात्र, बोटी पुढे आणल्या नाहीत. बोटी आणण्यासाठी दुसरा मार्ग दाखवूनही बोटी पुढे येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर पाण्यात उतरून वडिलांचा शोध घेण्याची त्यांना विनंती केली असता, पाण्यात मगर असतात, धोका कोण पत्करणार, असे सांगत त्यांनी पाण्यात न उतरता बघ्यांच्या गर्दीत उभे राहणे पसंत केल्याचा आरोप सनी याने केला आहे.
सायंकाळच्या सुमारास तेही निघून गेले. अखेर त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा सोडून आम्हीच बॅटरी, मोबाइलच्या प्रकाशात वडिलांचा शोध घेत आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने पालिका बोटींची व्यवस्था केली आहे. त्याच्यावरून शोध सुरू असल्याचे सनीने सांगितले. या प्रकरणी मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
कामावर जातो सांगून बाहेर पडले..
त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास कामावर जातो, असे सांगून घर सोडले. आम्ही त्यांना तलावावर जाण्यास विरोध केला असता, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले नसावे, असे त्यांचा मुलगा सनी याने सांगितले
शोध सुरू : या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्याकडे विचारणा केली असता, आमच्याकडून शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.