अश्वांनी पूर्ण केल्या तीन फेºया अन् माऊलींच्या गजरानं दुमदुमला आसमंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:46 PM2019-07-09T12:46:39+5:302019-07-09T12:49:01+5:30
माऊली पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण : खुडूस फाटा येथे भक्तिमय वातावरण
एल. डी. वाघमोडे
माळशिरस: अश्वांनी तीन फेºया मारल्यानंतर उपस्थित लाखो वैष्णवांनी माऊली माऊलींचा गजर करून आसमंत दणाणून सोडला़ माळशिरस येथील रात्रीचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज खुडूसच्या दिशेने निघाला़ सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी हा सोहळा खुडूस (ता. माळशिरस) हद्दीत पानीव पाटी येथे दाखल झाला़ या ठिकाणीच माऊलींचे जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले.
यावेळी सरपंच वंदना ठवरे, माजी सरपंच मच्छिंद्र ठवरे, डॉ़ तुकाराम ठवरे , पंचायत समिती सदस्य अजय सकट, बाळासाहेब वावरे, डॉ़ केशव सरगर, बाळासाहेब सरगर, महादेव ठवरे, ज्ञानदेव लोखंडे आदींच्या हस्ते पालखी व अश्वांचे पूजन झाले़ त्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरा रिंगण सोहळा खुडूस येथील अभिजित वाघ, जयवंत सिद यांच्या शेतात पार पडला. अश्वांनी तीन फेºया मारल्या अन् भाविकांनी माऊली माऊलींच्या गजराने आसमंत दुमदुमून सोडला़ अश्वांनी गोल रिंगण फेरी पूर्ण करताच उपस्थित वारकºयांनी घोड्याच्या पायाखालची माती उचलून कपाळी लावण्यासाठी एकच धावपळ केली. त्यानंतर उडीचा खेळ, फुगडी अशा खेळांनी परिसराला चैतन्य निर्माण झाले.
माऊलींसह विठ्ठलाच्या भेटीला निघालेला वैष्णवांचा मेळा खुडूस येथे विसावा घेऊन वेळापूर मुक्कामासाठी रवाना झाला. हा रिंगण सोहळा पार पडताच संपूर्ण मैदानात पुरुष व महिला वारकºयांनी फेर धरून फुगडीचा ठेका धरला.
पंढरी आली समीप
- आषाढी एकादशीला राज्यातून सर्व संतमहंतांच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात़ यात सर्वात मोठा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आहे़ आता पंढरपूर ३५-४० किमी अंतरावर येऊन ठेपले आहे़ २५ जूनपासून मुक्काम दरमुक्काम करीत ऊन, वारा, पावसाच्या सरी झेलत, लाखो वैष्णव पायी चालत ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत पंढरी जवळ करीत आहेत़ आता पंढरी जवळ आल्याची जाणीव भाविकांना होऊ लागली आहे़