हिंसक जमावाला रोखण्यासाठी नाशिकमध्ये हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 08:49 PM2017-02-23T20:49:31+5:302017-02-23T21:45:19+5:30
नाशिकमध्ये हिरावाडी परिसरातील मतमोजणी केंद्राजवळ जमलेल्या विविध राजकिय पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने परिसरात दगडफेक करत दहशत पसरविली.
नाशिक : हिरावाडी परिसरातील मिनाठाई ठाकरे स्टेडियममध्ये मतमोजणी सुरू होती. यावेळी प्रभाग तीनच्या मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेना व अन्य काही पक्षांच्या उमेदवारांनी केला. चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांना आघाडी मिळाल्याने मतमोजणीमध्ये फे रफार झाल्याच्या संशयावरुन अन्य राजकिय पक्षांचे कार्यकर्ते या ठिाकणी मोठ्या संख्येने एकत्र आले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक क रण्यास सुरूवात केली. हिंसक जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी एकूण चार राऊंड फायर केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. दगडफेकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. अन्य उमेदवार पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्याकडे अन्यायाविरुध्द दाद मागत आहे. परिस्थीती आटोक्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मतमोजणी केंद्रावरील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. प्रभाग तीन मधील चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांची आघाडी असल्याने अन्य उमेदवारांनी आक्षेप घेतला. तसेच एकूण मतदान २७००० प्रभाग तीन साठी दाखविण्यात आले मात्र मुळामध्ये एकूण २३००० मतदान झाल्याची नोंद आहे, असा दावा अन्य पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. या कारणावरून पोलीस आणि उमेदवार आमने-सामने आले. अन्य उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसह भाजपाचे कार्यकर्ते आपआपसांत भिडले. आमदार बाळासाहेब सानप हे भाजपाचे शहराध्यक्ष असून त्यांचा हा मतदारसंघ असलेला परिसर आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या उद्रेकाचा संताप पत्रकारांवर व प्रसिध्दीमाध्यमांच्या छायाचित्रकारांवर काढला. लाठीचार्जमध्ये प्रसिध्दीमाध्यमांचे प्रतिनिधींनाही पोलिसांनी लक्ष्य के ल्याचे वृत्त आहे. या भागामध्ये झालेल्या दगडफेकीत सुमारे वीस वाहनांचे नुकसान झाले आहे.