भाजपा जिल्हाध्यक्षांच्या भावावर गोळीबार
By admin | Published: June 30, 2017 01:30 AM2017-06-30T01:30:54+5:302017-06-30T01:30:54+5:30
भाजपचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक विक्रम पावसकर यांचा धाकटा भाऊ अजय पावसकर यांच्यावर तिघांनी गोळीबार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड (जि.सातारा) : भाजपचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक विक्रम पावसकर यांचा धाकटा भाऊ अजय पावसकर यांच्यावर तिघांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या चारही गोळ्या चुकवित अजय यांनी हल्लेखोरांवर दगडांचा मारा केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. बुधवारी रात्री हा थरार घडला.
कऱ्हाडातील पावसकर कुटुंबीय अनेक वर्षापासून हिंदू एकता आंदोलनचे काम करतात. अजय यांचे वडील विनायक पावसकर, आई विद्या पावसकर व मोठा भाऊ विक्रम हे तिघे कऱ्हाड येथे नगरसेवक असून विक्रम हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. अजय यांचा बांधकाम व्यवसाय आहे. बुधवारी रात्री अजय मित्रांसह कारमधून मलकापूर येथे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. जेवण करीत असताना अजय यांनी मोबाईलवरुन कॉल केला. बोलत ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभे होते. त्याचवेळी त्यांना गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता काही अंतरावरील महामार्गावर एकजण हातात पिस्तूल रोखून उभा असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती अजय यांच्या दिशेने गोळ्या झाडत होती. हल्लेखोराने सलग झाडलेल्या गोळ्या अजयनी चुकविल्या. त्या हल्लेखोरांच्या दिशेने दगड मारण्यास सुरूवात केली. तसेच आरडाओरडा केला.अजय यांच्या ओरडण्यामुळे हॉटेलमधील मित्र बाहेर आले. तोपर्यंत गोळ्या झाडणारी व्यक्ती आणि अन्य दोघे पसार झाले.