भाजप आमदाराकडून गोळीबार; अजित पवारांचा संताप, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:10 AM2024-02-03T11:10:45+5:302024-02-03T11:16:24+5:30

अजित पवार यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. 

Firing by BJP MLA ganpat gaikwad in ulhasnagar ncp Ajit Pawar first reaction | भाजप आमदाराकडून गोळीबार; अजित पवारांचा संताप, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

भाजप आमदाराकडून गोळीबार; अजित पवारांचा संताप, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

MLA Ganpat Gaikwad Firing ( Marathi News ) : उल्हासनगरमध्ये सत्ताधारी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. पोलीस ठाण्यातच हा गोळीबार करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत याबाबत आपण भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. 

आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार चुकीचा असल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, "उल्हासनगरमधील घटना सर्वांनी पाहिली असून  आमदार गायकवाड हे वैतागलेल्या माणसासारखे बोलत होते. मात्र संविधानाने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे," असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी याबाबतही भाष्य केलं. "गायकवाड यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. संबंधित घटनेबद्दल मी माहिती घेणार असून याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे," असं अजित पवार म्हणाले.

गणपत गायकवाड यांचे शिंदे पिता-पुत्रावर गंभीर आरोप

आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र व कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. "एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत माझे खूप पैसे बुडवले आहेत. तसंच मी आमदार निधीतून केलेल्या अनेक कामांचं श्रेय घेण्यासाठी मी काम केलेल्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबरदस्तीने आपल्या नावाचा बोर्ड लावतात. एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारी पोसली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे," अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Firing by BJP MLA ganpat gaikwad in ulhasnagar ncp Ajit Pawar first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.