माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार

By Admin | Published: June 24, 2017 12:48 AM2017-06-24T00:48:30+5:302017-06-24T00:51:50+5:30

कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला; मात्र त्यातून ते बचावले.

Firing on former MLA Ravi Kant Patil | माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार

माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 24 : कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला; मात्र त्यातून ते बचावले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता झळकी (कर्नाटक) येथे घडली. वाळू तस्करीतून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले. पिंटू पाटील आणि हणमंत पाटील या वाळू व्यवसायातील दोघा भावांवर झळकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा केला जात असल्याची तक्रार माजी आमदार रविकांत पाटील यांनी पोलिसांकडे वारंवार केली होती. पोलिसांनी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. शुक्रवारी दुपारी रविकांत पाटील यांनी वाळू वाहतूक करणारी चार वाहने अडवली. या वाहनात परवान्यापेक्षा अधिक वाळू वाहतूक केली जात होती. पाटील यांनी ही वाहने बळजबरीने वजन काट्याकडे वळवली. त्यातील दोन वाहन चालकांनी शिताफीने वाहने पळवून नेली. उर्वरित दोन वाहनांचे वजन करण्यासाठी रविकांत पाटील व त्यांचे वाहनचालक वजन काट्याजवळ उभे असताना त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आणि हल्लेखोर पसार झाले. यात कोणीही जखमी झाले नाही. ती दोन्ही वाहने रविकांत पाटील यांनी झळकी पोलीस ठाण्यात नेली आणि वाळू तस्करी करणारे पिंटू बाबुराव पाटील आणि हणमंत बाबुराव पाटील (रा.शेगाव ता.अक्कलकोट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि पाटील यांच्यात गुन्हा दाखल करण्यावरुन वादविवाद सुरु होता. रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान झळकी पोलिसांनी पिंटू पाटील व हणमंत पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला, अशी माहिती रविकांत पाटील यांचे चिरंजीव विराज पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या काही महिन्यांपासून पिंटू पाटील आणि माजी आमदार रविकांत पाटील यांच्यात वाळू उपसा आणि वाहतुकीबद्दल वाद सुरु होता. रविकांत पाटील यांनी चार तरुणांना आपल्याकडे पाठवून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार पिंटू पाटील यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात केल्याचे समजते. हा राग रविकांत पाटील यांना होता. वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी त्यांनी शुक्रवारी वाहनांवर पाळत ठेवून ही वाहने पकडली. वाहनात परवाना आणि क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक केली जात होती. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली होती. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला.
 

रविकांत पाटील यांनी मला वारंवार धमक्या दिल्या.वाळू उपसा करणार असशील तर तीन कोटी रुपये दिले पाहिजेत असा दम भरला. आठ दिवसांपूर्वी चार गुंडांना माझ्याकडे पाठविले. त्या गुंडांना मी धरुन ठेवले असता. रवी पाटील यांनी हातापाया पडून त्यांना सोडवून नेले. तोच राग मनात धरुन त्यांनी आज मी गोळीबार केल्याचा आळ घेतला आहे. ही घटना पूर्ण खोटी आहे. गोळीबार झालाच नाही.
पिंटू बाबुराव पाटील, शेगाव

गेल्या काही महिन्यांपासून पिंटू पाटील हा अवैध मार्गाने वाळू उपसा करुन कर्नाटकात वाहतूक करीत होता. त्याच्या गाड्या नेहमी ओहरलोडेड असायच्या, त्यातून अनेक अपघात झाले आहेत. साहेबांनी (रविकांत पाटील) त्याला ताकीद दिली. परंतु तो मुजोरीने वागत होता. त्यामुळे आज त्याची वाहने पकडून वजन करीत असताना, दोघांनी गोळीबार केला.
विराज पाटील
रविकांत पाटील यांचे चिरंजीव

Web Title: Firing on former MLA Ravi Kant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.