जनावरांच्या तस्करांकडून हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार
By Admin | Published: August 22, 2016 06:49 PM2016-08-22T18:49:29+5:302016-08-22T18:49:29+5:30
दोन ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. २२ : दोन ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान येथील बसस्थानकाजवळ तस्करांनी हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार केला. चार फैरी झाडल्यानंतर ते वेगाने पसार झाले. मात्र पडोलीजवळ पोलिसांनी त्यातील एक ट्रकला अडवून एका आरोपीला अटक केली. हा प्रकार काल रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.
चंद्रपुरात माता महाकालीचे दर्शन घेऊन हिंदू रामसेनेचे अध्यक्ष तथा गृहमंत्रालयाचे हिंदी सल्लागार सदस्य श्रीनिवास संभाशिव ध्यावर्तीवार व त्यांचे मित्र विशाल नगराळे, मधुकर अल्लूरवार, रमेश गादरवार, निखील कल्लारवार आणि अन्य दोघे हे बोलेरो व अन्य एका वाहनाने नागपूरकडे जात होते. दरम्यान जाम येथील एका चहा टपरीवर ते थांबले. तिथे थांबलेल्या दोन ट्रकमधून त्यांना उग्र वास आला. चौकशीनंतर दोन्ही ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याचे त्यांना समजले. हे ट्रक नागपूरवरून चंद्रपूरकडे जात होते. ध्यावर्तीवार व त्यांच्या सहकार्यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. सोबतच याची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली. परंतु पोलीस उशिरा पोहचल्याने ट्रक वरोऱ्यापुढे निघून गेले. दरम्यान नंदोरी टोल नाक्यावर ट्रकला अडविण्यात आले. मात्र टोलनाक्याचे बॅरिकेट तोडून ट्रक वेगाने पुढे निघाले.
दरम्यान, भद्रावती पोलिसांनी पेट्रोलपंप चौकात बॅरिकेट लावून ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही ट्रक बॅरिकेट तोडून पुढे गेले. हिंदू रामसेनेचे कार्यकर्ते याही स्थितीत त्यांचा पाठलाग करीत होते. भद्रावतीच्या नवीन बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर तस्कराचे वाहन येताच त्यांनी तिथून ध्यावर्तीवार यांच्या वाहनावर गोळीबार सुरू केला. यावेळी त्यांनी चार फेरी झाडल्या. या गोळ्या वाहनाला लागल्या. सुदैवाने प्राणहानी टळली. गोळीबारानंतरही भद्रावती पोलीस आणि रामसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग सुरूच ठेवला. दरम्यान, पडोलीजवळ यातील एका ट्रकला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेत एका आरोपीला अटक केली. मात्र गोळीबार करणारे चारचाकी वाहन व आणखी एक ट्रक पळून जाण्यात यशस्वी ठरले. जिल्हा पोलीस उपअधीक्षक हेमराजसिंग राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवर हे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
पाठलाग करणाऱ्या वाहनाचा अपघात
जनावर तस्करांच्या ट्रकचा पाठलाग करीत असताना हिंदू रामसेनेच्या एका वाहनाला अपघात झाला. या अपघातात हिंदू रामसेनेचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.