वाशिममध्ये होणार पहिले अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन
By admin | Published: January 29, 2016 01:58 AM2016-01-29T01:58:13+5:302016-01-29T01:58:13+5:30
तब्बल २३ राज्यांमध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. बंजारा संस्कृती संपन्न असली, तरी ती अलिखित स्वरुपात आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील बंजारा साहित्याचे संकलन करण्यासाठी
यवतमाळ : तब्बल २३ राज्यांमध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. बंजारा संस्कृती संपन्न असली, तरी ती अलिखित स्वरुपात आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील बंजारा साहित्याचे संकलन करण्यासाठी पहिल्यांदाच अखिल भारतीय स्तरावरचे बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बंजारा समाजाची काशी पोहरादेवी ज्या जिल्ह्यात आहे, त्या वाशीममध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे.
येत्या ६ आणि ७ फेब्रुवारीला अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन होत असल्याची माहिती रविवारी यवतमाळात पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गबरूसिंग राठोड (औरंगाबाद), आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, प्रा. डॉ. विजय जाधव उपस्थित होते.
डॉ. टी. सी. राठोड म्हणाले, बंजारा तांड्यांची अवस्था आजही भकास आहे. त्यांच्यापर्यंत नव्या परिवर्तनाचे वारे पोहोचविण्यासाठी हे संमेलन घेण्यात येत आहे. समाजाचा इतिहास केवळ मौखिक रूपात आहे. तो शब्दबद्ध करण्याच्या दृष्टीनेही यातून प्रयत्न होणार आहेत.
नव्या पिढीला परिवर्तनवादी विचार कळावे, त्यांनी ते आचरणात आणून समाज पुढे न्यावा, यासाठी साहित्य संमेलनातून प्रयत्न केले जाणार आहेत. तर संमेलनाध्यक्ष गबरूसिंग राठोड म्हणाले, स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजातील शिक्षित तरुणांना साहित्य कळू लागले.
काही चांगले लेखकही तयार होत आहेत. परिवर्तनवादी विचारही मांडत आहेत. मात्र, हे सर्व शहरीवर्गापुरतेच मर्यादित आहे.
आता हा परिवर्तनाचा विचार खेड्यांपर्यंत, तांड्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठीच संपूर्ण भारतातील बंजारा लेखकांना, साहित्यिकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्णपणे बंजारा बोलीतून होणारे हे संमेलन निश्चितच आगळे-वेगळे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य गबरुसिंग राठोड
औरंगाबाद तालुक्यातील कचनेर येथील साहित्यिक प्राचार्य गबरुसिंग राठोड हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. १९६९ ते २००३ पर्यंत मुख्याध्यापक व प्राचार्य राहिलेले गबरुसिंग राठोड यांची आत्तापर्यंत २५ पुस्तके आणि दीडशेवर लेख प्रकाशित झाले आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते असलेले प्राचार्य राठोड हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अ.भा. सत्यशोधक समाज, सत्यशोधक ओबीसी परिषद, बामसेफमध्ये सक्रिय आहेत.