कोर्लई कथित बंगला प्रकरणात पहिली अटक; माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 04:44 AM2023-04-11T04:44:37+5:302023-04-11T04:45:21+5:30
प्रकरणात पहिलीच अटक झाली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अलिबाग :
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पहिलीच अटक झाली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई येथे जागा आहे. या जागेत असलेल्या कथित बंगल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रेवदंडा पोलिस ठाण्यात तीन ग्रामसेवक, माजी सरपंच, सदस्य यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी असलेले ग्रामसेवक यांना जिल्हा न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांचेही या प्रकरणात आरोपी म्हणून गुन्ह्यात नाव होते.
सोमवारी १० एप्रिल रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत मिसाळ यांना कोर्लई येथून पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत मिसाळ यांच्या अटकेमुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिसाळ यांच्यानंतर कोणाचा नंबर लागतो याकडे आता लक्ष लागले आहे.