पहिल्या मुक्कामस्थळाचा विकास आवश्यक
By admin | Published: June 10, 2017 01:52 AM2017-06-10T01:52:10+5:302017-06-10T01:52:10+5:30
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्रीक्षेत्र देहूगावचा विकास होत असतानाच जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्रीक्षेत्र देहूगावचा विकास होत असतानाच जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या पहिल्या मुक्कामाचे स्थळ इनामदारवाडा व वाड्यालगतच्या श्री संत तुकाराममहाराज जन्मस्थानाच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन तातडीने विकास हाती घ्यावा, अशी मागणी संस्थानाच्या विश्वस्त व ग्रामस्थांची आहे. मात्र, या पालखीतळाच्या विकासात जागेची उपलब्धता मोठा अडसर असल्याचे समोर आले आहे. काही जागामालक जन्मस्थानाचा विकासासाठी जागा देण्यास तयार आहेत. उर्वरित लोकांशी चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो. याबाबत शासनानेच तोडगा काढून या पालखीतळाचा व जन्मस्थानाचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
श्री संत तुकाराममहाराज व श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला श्री संत तुकाराम महाराजांचे पूत्र व पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज यांनी सुमारे ३३१ वर्षांपूर्वी म्हणजे इ. स. १६८६ मध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात केली. हा सोहळा प्रथम अत्यंत कमी लोकांसह पंढरपूरकडे जात होता. कालांतराने पालखी सोहळ्याला राजाश्रय मिळाला आणि पालखी सोहळ्याचे स्वरूप हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली.
पालखीसोहळा सुरू झाल्यापासून पालखीचा पहिला मुक्काम हा नारायणमहाराजांच्या घरी म्हणजे इनामदारवाडा येथे असायचा. त्यानंतर हा पालखी सोहळा आळंदीमार्गे पंढरपूरकडे रवाना होत असे.
सध्या पालखीसोहळा पारंपरिक पद्धतीने होत असला, तरी त्याचे स्वरूप काहीसे बदललेले पहावयास मिळते. पालखी प्रस्थानापूर्वी येथील मानकरी घोडेकर कुटुंबीय महाराजांच्या चांदीच्या पादुकांना चकाकी देऊन इनामदारवाड्यात विधिवत आणतात. तेथे त्यांची पूजा होते व तेथून मानकरी व सेवेकरी गंगामसल्याचे मसलेकर या पादुका डोक्यावर घेऊन मुख्य मंदिरात येतात. तेथे पादुकांची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर पालखी प्रस्थान होत असते.
काही वर्षांपूर्वी मांढरदेवी यात्रेत झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या वर्षी थेट धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीसदेखील उपाययोजना करणार आहेत. त्यातून पोलीस व स्थानिक यांच्यात वाद होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
वाड्याच्या अंतर्गत भागात पालखीला लागणारी जागा, भजन-कीर्तन करणारे लोक व जागरणासाठी उपस्थित भाविकांना बसण्याची फारशी जागा उपलब्ध असत नाही. पाऊस पडत असेल, तर अत्यंत बिकट अवस्था होते. या अडचणींवर मात करण्यासाठी येथील जागेचा व जन्मस्थानाचा विकास करावा, अशी येथील नागरिकांसह संस्थानच्या विश्वस्तांची मागणी आहे. मात्र, अद्यापही याचा गांभीर्याने विचार झालेला दिसत नाही.
इनामदारवाड्याच्या एका बाजूला श्री संत तुकाराममहाराजांचे जन्मस्थान व एका बाजूला विठ्ठल-रुक्मिणीचे मुख्य मंदिर आहे. गेल्या चार वर्षांपासून देहूमध्ये शासन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामे करीत आहे. या माध्यमातून इंद्रायणी नदीचा घाट, अंतर्गत रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या व भूमिगत गटारे, विद्युतीकरण, रस्ते,भक्त निवास व अन्नछत्र, सार्वजनिक शौचालये, पूल, स्मशानभूमी यांचा विकास झाला आहे. अद्यापही काही कामे शिल्लक असून, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.
चिंचोलीतील पहिल्या विसाव्याची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या चिंचोली येथील पादुका मंदिर या पहिल्या विसाव्याच्या परिसरात ठेकेदाराने इंटरनेट केबलसाठी दोन महिन्यांपूर्वी खोदलेले मोठे चर अद्यापही बुजविले नाहीत. त्यामुळे पायी वारीतील वारकऱ्यांची विसाव्याला मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. खोदलेल्या लांबलचक चरामुळे चिंचोली, किन्हई, कान्हेवाडी व पंचक्रोशीतून पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होणार असून, चरात पडून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संत तुकाराममहाराज पालखीचे १६जूनला देहूगावातून प्रस्थान होणार आहे. दुसऱ्या दिवशी देहूगावातून निघाल्यानंतर दुपारचा पहिला विसावा दर वर्षी चिंचोलीत शनि मंदिर व पादुका मंदिर येथे असतो. या ठिकाणी मोठे रिकामे माळ मोकळे असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत नाही. येथे सोहळ्यातील वारकरी व भाविक दुपारचे भोजन घेत असतात. चिंचोली व किन्हईचे ग्रामस्थ वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करीत असतात. विविध लष्करी आस्थापनांच्या वतीने फराळ व नित्योपयोगी वस्तूंच्या वाटपासाठी स्वागत कक्ष उभारण्यात येत असतात. सोहळा या ठिकाणी दोन तास थांबत असल्याने काही भाविक भोजन झाल्यावर येथील माळरानावर आराम करतात. मात्र, परिसरात खोदलेल्या मोठ्या चरांनी जागा व्यापली असून, काही ठिकाणी चर बुजविले नसल्याने अपघाताचा धोका आहे. वारकऱ्यांच्या भोजन व विसाव्यासाठीच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या महिन्यात वादळी पावसात किन्हई फाट्यालगत दोन बाभळीची झाडे उन्मळून पडलेली आहेत. विसावा परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. चर बुजविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्याबाबतची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भेगडे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.