धुळ्यात होणार पहिला जैवकचरा विघटन प्रकल्प
By admin | Published: February 16, 2017 08:34 AM2017-02-16T08:34:31+5:302017-02-16T08:34:55+5:30
सुमारे १ हजार लहान-मोठ्या दवाखान्यांमधील बायोमेडिकल (जैविक कचरा) कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खान्देशातील पहिला शासकीय प्रकल्प धुळ्यात उभारला जाणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत/निखिल कुळकर्णी
धुळे, दि. 16 - जिल्ह्यातील सुमारे १ हजार लहान-मोठ्या दवाखान्यांमधील बायोमेडिकल (जैविक कचरा) कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खान्देशातील पहिला शासकीय प्रकल्प धुळ्यात उभारला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही़ काही खासगी संस्थांकडून हा कचरा संकलित केला जात असला तरी त्यावर अधिक खर्च येतो़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत सुमारे एक ते सव्वा एकर जागेवर होणाऱ्या या प्रकल्पात १०० किलोमीटर परिघातील सर्व खासगी दवाखाने, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, प्रयोगशाळा याठिकाणी निर्माण होणारा वैद्यकीय कचरा विघटनासाठी या प्रकल्पात दिला जाऊ शकतो़.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सध्या स्वतंत्र खासगी संस्थेकडून जैविक कचरा संकलित केला जातो, त्यासाठी लहान दवाखान्यांमध्ये ३०० ते ३५० रुपये प्रती महिना व मोठ्या रुग्णालयाला १० रुपये प्रती बेड याप्रमाणे खर्च येतो़
शासकीय प्रकल्प झाल्यास हा खर्च ५० टक्क्यांवर येणार आहे़ आयएमएकडून कचरा संकलनासाठी सहकार्य केले जाणार आहे़ शिवाय या कचऱ्याचे विघटन शास्त्रोक्त पध्दतीने होईल.
प्रकल्पाचे भूमिपूजन मागील वर्षी डॉ़. मार्तंड पिल्लैय व डॉ़ रवी वानखेडकर यांच्या हस्ते झाले होते. लवकरच कामास सुरुवात होणार आहे़ आयएमएने यापूर्वी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाशी संलग्न जैविक व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो होऊ शकला नाही़
‘बीओटी’वर प्रकल्प उभारण्याचा विचार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून बीओटी तत्त्वावर हा प्रकल्प
उभारण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पात ओला व सुका जैविक कचरा वेगवेगळा संकलित केला जाईल. सुका कचरा जाळून नष्ट केला जाईल तर ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट केला जाणार आहे़ सिरींज, सलाईन, बॅन्डेड साहित्य, मानवी अवयव, औषधी, रक्त यासारख्या कचऱ्याचा समावेश असेल.