पहिल्या वाढदिवसालाच चिमुकल्याने दिला शहीदाला भडाग्नी
By Admin | Published: June 24, 2017 10:58 PM2017-06-24T22:58:19+5:302017-06-24T22:58:19+5:30
शिवेंद्र २४ जूनला एक वर्षाचा होणार; परंतु मला येता येणार नाही, असे एप्रिलमध्येच सांगून गेलेले बाबा असे अचानक वाढदिवसाला हजर झाले.
औरंगाबाद, दि. 24 : शिवेंद्र २४ जूनला एक वर्षाचा होणार; परंतु मला येता येणार नाही, असे एप्रिलमध्येच सांगून गेलेले बाबा असे अचानक वाढदिवसाला हजर झाले. तुम्ही तुमचेच वचन कसे तोडले... म्हणून टाहो फोडणारी पत्नी, वडील आणि कुटुंबीय, तर ज्या हातांनी आज केक कापायचा त्या हातात भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीर पित्याच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी चिमुरड्या शिवेंद्रच्या हाती टेंभा. सारंकाही अकस्मात, अकल्पित तरीही स्वाभिमान आणि अभिमानाने छाती फुलविणारे. एका डोळ्यात अश्रू, तर दुस-या डोळ्यात तेजाळती राष्ट्रनिष्ठा. प्रसंग होता शहीद जवान संदीप जाधव यांच्या अंत्यविधीचा.
अवघ्या नऊ वर्षांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील संदीप जाधव यांना पाकिस्तानी लष्कराशी झुंज देताना सीमारेषेवर गुरुवारी वीरमरण आले, तर या घटनेनंतर अवघ्या तिस-या दिवशी (शनिवारी) ममुलगा शिवेंद्रचा पहिला वाढदिवस. चिमुकल्या हातानेच त्याला वडिलांच्या चितेला भडाग्नी द्यावा लागला. हा दुर्दैवी योगायोग पाहून व या चिमुकल्याची माता, वीरपत्नीच्या काळजाला चिरणाऱ्या किंकाळ्यांमुळे हजारो मने हळहळली.
शहीद संदीप जाधव यांचे पार्थिव औरंगाबादहून सकाळी ७ वाजता सिल्लोडच्या दिशेने रवाना झाले. सिल्लोडपासून पुढील खड्डेमय रस्त्यावरून लष्कराचा ताफा संथगतीने केळगावच्या दिशेने सरकत होता. रस्त्यावरील प्रत्येक गावात शहीद वीराला चौकाचौकांत अभिवादन केले जात होते. मार्गात श्रद्धांजलीपर फलक झळकत होते. पंचक्रोशीतील एकाही गावात सकाळी चूल पेटली नव्हती. शहिदाचे पार्थिव नेणारा ताफा पुढे सरकल्यानंतर नागरिक आपल्या दैनंदिन कामाकडे वळत होते. केळगावच्या मुर्डेश्वरांच्या कमानीजवळ गावकऱ्यांचा मोठा जमाव होता. दोन दिवसांपासून अधीर झालेल्या गावकऱ्यांनी पार्थिव तेथे पोहोचताच हंबरडा फोडला. गावाच्या वेशीवरच सजवलेले ट्रॅक्टर सज्ज होते. त्यात हे पार्थिव ठेवण्यात आले. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी मानवंदना दिल्यानंतर पार्थिव गोकुळवाडीकडे निघाले. तेव्हा दोन किलोमीटरपर्यंत मानवी साखळीच तयार झाली. अनेकांनी सकाळीच गोकुळवाडी जवळ केली होती. संदीपचे पार्थिव आल्यानंतर सर्व वातावरण भारून गेले. डोळ्यात अश्रू आणि देशाच्या रक्षणासाठी आपला सुपुत्र कामी आल्याचा अभिमान अशा संमिश्र भावनांचा पूर मनोमनी दाटला होता. गावातील प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला होता; परंतु संदीप यांच्या पत्नी व मुलांकडे पाहून अश्रूंना बांध घालणे त्यांना अशक्य होत होते.
आपला पोटचा गोळा गेलाय, शहीद झालाय, ही वार्ता टीव्हीवर पाहिल्यापासून अन्नपाणी वर्ज्य केलेल्या कुटुंबियांवर कोसळलेले दु:ख शब्दातीत होते. त्यांची अवस्था सर्वांचे मन हेलावून टाकत होती. त्याही स्थितीत शहिदाचे वडील सर्जेराव प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत होते. प्रत्येकास भेटत होते. संदीपविषयी भरभरून सांगत होते. ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, गुरुवारी रात्री ९.३० वाजता मला बातमी कळली. तेव्हा संदीपची मुलगी टी.व्ही.वर बाबांचा फोटो, बाबांचा फोटो, असे ओरडून सांगत होती. एप्रिलमध्ये गावाकडे आला तेव्हा मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला येता येणार नसल्याचे त्याने सांगितले होते. शहीद होण्याच्या एक दिवस अगोदरही फोनवर त्याच्याशी बोलणे झाले. मात्र, दुसराच दिवस असा येईल, असे स्वप्नीही नव्हते.
गोकुळवाडीत सर्वांनाच संदीपचे पार्थिव पाहण्याची ओढ होती. केव्हा येणार? कुठपर्यंत आले? अशी सतत विचारणा सुरू होती. केळगावचे सरपंच अंत्यविधीच्या तयारीची पाहणी करीत होते. गावातील युवकांचे पथक सर्वांना सूचना देत होते. तोच पार्थिव मुर्डेश्वरांच्या कमानीजवळ आल्याची वर्दी मिळाली. तेथे हजारोंचा जनसमुदाय जमा झाल्यामुळे दीड किलोमीटरपर्यंत गोकुळवाडीचे अंतर कापण्यासाठी तब्बल एक तास लागला. पोलिसांनी गोकुळवाडीपासून दूरवर वाहनांना प्रवेशबंदी केली होती. तरीही जमाव नियंत्रणात ठेवणे कठीण होत होते. गोकुळवाडीच्या शेजारीलल शेतातच अंत्यसंस्कारासाठी ओटा करण्यात आला होता. हा परिसर नागरिकांनी व्यापला होता. संदीप यांचे पार्थिव काही वेळेसाठी घरी नेले; परंतु जमावास तिकडे जाण्यास मज्जाव होता. नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर टाळ-मृदंग आणि भजनाच्या गजरात १०० मीटरपर्यंतची अंत्ययात्रा निघाली. राष्ट्रप्रेमाने ओतपोत भरलेल्या नागरिकांची पार्थिवापर्यंत जाण्याची जिवापाड धडपड सुरू होती. ध्वनिक्षेपकावरून सातत्याने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले जात होते; परंतु प्रत्येकाला एकदा का होईना शहिदाचा वीर चेहरा पाहण्याची उत्कंठा होती.