आधी गुजरातचे तुकडे करा!

By admin | Published: April 9, 2016 04:03 AM2016-04-09T04:03:08+5:302016-04-09T04:03:08+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार.

First break pieces of Gujarat! | आधी गुजरातचे तुकडे करा!

आधी गुजरातचे तुकडे करा!

Next

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. संघाने आधी गुजरातचे तुकडे करावेत, मग महाराष्ट्राचे बोलावे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाचा समाचार घेतला.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज यांनी तब्बल ७ वर्षांनंतर शिवाजी पार्कवरील जाहीर सभा घेतली. एक तासाच्या भाषणात त्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एमएमआयएमच्या ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात जाणीवपूर्वक विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करण्याची भाषा केली जात आहे, असे सांगत सर्वाधिक काळ राज्यात आणि केंद्रात सत्ता भोगूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना त्यांच्या भागाचा विकास करता येत नसेल तर त्याचा दोष महाराष्ट्रावर कसा? इतका काळ सत्ता भोगूनही आपल्या भागाचा विकास करता येत नसेल तर खुर्च्या सोडा. पण तुमच्यासाठी महाराष्ट्र तोडू देणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला.
जे महाराष्ट्रात घडतेय तेच केंद्रात घडत आहे. मोदींनी गुजरातचा विकास केला म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण पंतप्रधान झाल्यापासून ते बदलून गेले. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्या मोदींनी केसाने गळा कापला, म्हणून आज मोदींवर टीका करीत आहे. सत्तेवर येताना भाजपाने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविली होती. आज काहीच घडत नसल्याने सत्ताधाऱ्यांचा नालायकपणा झाकण्यासाठी आरएसएसच्या आडून भावनिक मुद्दे उगाळले जात आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या भाषणानंतर तीनवेळा ‘भारतमाता की जय’चा नारा द्यायच्या. भाजपा आणि संघाने देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटू नयेत, असा टोला राज यांनी लगावला.
सोनारांच्या आंदोलनावर भाष्य करताना राज म्हणाले, विरोधात असताना हेच मोदी या अबकारी कराच्या विरोधात होते. ते म्हणाले होते की, हा कायदा आला तर सोनार आत्महत्या करतील. मग आता तोच कायदा का आणत आहात?
देवेंद्र फडणवीस हे तर वर्गातील मॉनिटर आहेत. मुख्यमंत्री पदावरून काढले तरी भारतमाता की जय म्हणणार, असे ते म्हणाले. पण कोण काढतेय? काहीही बोलायचे! आधी राज्यात ज्या वाईट गोष्टी चालल्यात त्या बंद करा, असा टोला राज यांनी हाणला.
गळ्यावर सुरा ठेवला तरी ‘भारतमाता की जय’ बोलणार नसल्याची भाषा ओवैसी करतो. इकडे महाराष्ट्रात ये फिरवून दाखवितो, असे म्हणत राज यांनी ओवैसींना लक्ष्य केले. भाजपाच्या पैशावर ओवैसींचा सारा कारभार चालू आहे, असा आरोपही राज यांनी केला.
मनसेवर आंदोलन अर्धवट सोडण्याचा आरोप होतो. मराठी पाट्या, मराठी सिनेमे, रेल्वेतील मराठी टक्का आणि टोलसारखे आंदोलन मनसेने सत्ता नसतानाही यशस्वी केले. आंदोलन अर्धवट सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी राम मंदिर आंदोलनाचा खुलासा करावा.
शिवसेनेच्या जैतापूर आंदोलनाचे काय झाले? असे विचारत शिवसेनेच्या भूमिकेचाही समाचार घेतला. सत्तेत राहायचे आणि रुसूबाई.. रुसूबाई करायचे. पटत नसेल तर सत्तेतून बाहेर व्हा. पण सत्ताही उबवायची आणि कोंबडेही खायचे, असा हा प्रकार आहे.

Web Title: First break pieces of Gujarat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.