आधी मल्ल्याला पकडा, मगच दंड भरेन - विनातिकीट प्रवास करणा-या महिलेचा कारनामा
By admin | Published: March 23, 2016 01:11 PM2016-03-23T13:11:38+5:302016-03-23T13:12:29+5:30
बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांना आधी पकडा, मगच मी दंडाची रक्कम भरेन' असे सांगत विनातिकीट प्रवास करणा-या एका महिलेने दंड न भरता तुरूंगात जाण्याची तयारी दर्शवली
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - ' बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांना आधी पकडा, मगच मी दंडाची रक्कम भरेन' असे सांगत विनातिकीट प्रवास करणा-या एका महिलेने दंड न भरता तुरूंगात जाण्याची तयारी दर्शवली.
दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात राहणा-या ४४ वर्षीय प्रेमलता भन्साळी यांना रविवारी तिकीट चेकरने विनातिकीट प्रवास करताना महालक्ष्मी स्टेशन येथे पकडले. त्यानंतर टी.सीने त्यांना दंड म्हणून २६० रुपये भरण्यास सांगितले असता प्रेमलता यांनी तसे करण्यास नकार दिला. 'बँकांचे हजारो कोटी रुपये बूडवून परदेशात पसार झालेल्या मल्ल्यांना आधी तुम्ही पकडा, मगच मी पैसे भरेन' असे भन्साळी सांगितले. त्यानंतर भन्साळी यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले व त्यांना दंड भरण्यास सांगितले असता त्यांनी तसे करण्यास नकार दिला आणि तुरूंगात जाण्याची तयारी दर्शवली' अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
आरपीएफच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कॉन्स्टेबलने प्रेमलता भन्साळी यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र भन्साळी १२ तासांहून अधिक काळ अधिका-यांशी हुज्जत घालत होत्या. 'लोकांना फसवणा-या मल्ल्यासारख्या व्यक्तीबाबत अधिकारी एवढे मवाळ का आणि सामान्यांना मात्र त्रास का देत आहेत असा सवाल त्या सतत विचारत होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे पती रमेश भन्साळी यांनाही समन्स बजावला, मात्र प्रेमलता दंड न भरण्याच्या व ७ दिवसांसाठी तुरूंगात जाण्याच्या मुद्यावर ठाम राहिल्या' असेही पोलिसांनी सांगितले.