पहिल्या दिवशी ११ हजार लोकांनी घेतले शिवभोजन; राज्यात १२२ केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 02:42 AM2020-01-28T02:42:26+5:302020-01-28T02:52:33+5:30
खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट, मेसच्या माध्यमातून शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे.
मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात रविवारी शिवभोजन योजनेची सुरुवात करण्यात आली. एकूण १२२ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ लोकांनी या योजनेंतर्गत जेवण केल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
भुजबळ म्हणाले, राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून ‘शिवभोजन’ या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांच्या माध्यमातून गरिबांना १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवभोजन योजनेची राज्यात काटेकोर
अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभागाला सूचना देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यात २, अमरावतीत ३, बुलडाणा ३, वाशिम २, औरंगाबाद ४, बीड १, हिंगोली १, जालना २, लातूर १, नांदेड ४, उस्मानाबाद ३, परभणी २, पालघर ३, रायगड ४, रत्नागिरी ३, सिंधुदुर्ग २, परळ ३, अंधेरी ३, वडाळा २, ठाणे ७, कांदिवली २, भंडारा २, चंद्रपूर ३, गडचिरोली १, गोंदिया २, नागपूर ७, वर्धा २, अहमदनगर ५, धुळे ४, जळगाव ७, नंदूरबार २, नाशिक ४, कोल्हापूर ४, पुणे १०, सांगली ३, सातारा ४, सोलापूर ५ अशी केंद्रे सुरू झाली आहेत.
१२ ते २ या वेळेत भोजन उपलब्ध
खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट, मेसच्या माध्यमातून शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे. या केंद्रांतून योजनेंतर्गत दुपारी १२ ते २ या वेळेत भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. लाभार्थींच्या १० रुपयांच्या रकमेव्यतिरिक्तची उर्वरित रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अनुदान म्हणून केंद्र चालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुंबई, ठाण्यात एकूण १७ केंद्रे
राज्यात एकूण १३९ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी १२२ केंद्र कार्यरत झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तीन केंद्रांना मान्यता देण्यात आली असली तरी अद्याप एकही केंद्र सुरू झालेले नाही. मुंबई आणि ठाण्यात एकूण १७ केंद्र मंजूर असून ही सर्व केंद्र सुरू झाली आहेत. पुण्यात सर्वाधिक ११ केंद्र मंजूर असून त्यापैकी दहा केंद्र कार्यरत झाली आहेत.