अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १३व्या मिनिटाला संपले कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:43 AM2020-02-25T02:43:37+5:302020-02-25T02:43:49+5:30

विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळला

The first day of the convention ended in the 5th minute | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १३व्या मिनिटाला संपले कामकाज

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १३व्या मिनिटाला संपले कामकाज

Next

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अगदी १३व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज संपले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्यांवर विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजीला सुरूवात केली. मात्र, या गदारोळातच सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. विरोधकांच्या गदारोळात अवघ्या १३ व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज उरकले गेले.

वंदे मातरमने दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची सूचना दिली होती. महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन मांडण्याचा प्रयत्न केला. यावर, शिवसेना सदस्य दिवाकर रावते यांनी हरकत घेतली. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. यापूर्वी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगन प्रस्ताव घेण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगनच्या सूचना घ्याव्यात, अशी मागणी केली. तर, गेली पाच वर्ष आम्ही सुद्धा हीच मागणी करत होतो. मात्र, एका स्थगनवर चारचार सदस्य भाषणे ठोकत होते. त्या पाच वर्षात शिवाजीराव देशमुख यांच्या आदेशाचे पालन झालेले नाही. आता हीच नवी प्रथा बनली आहे. आम्ही विरोधात आलो म्हणून लगेच प्रथा बदलू नये, अशी मागणी भाजप सदस्य भाई गिरकर यांनी केली. यावर अनेक आदेशांचे पालन झाल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. काही बाबी होऊ शकल्या नसतील तर त्या तशाच चालू ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका मांडत सभापतींनी स्थगन प्रस्तावाच्या सूचना फेटाळून लावल्या.

संतप्त विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. या गदारोळातच २०१९-२० च्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्र सभागृहासमोर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व कामकाज पुकारले गेले. अवघ्या १३ व्या मिनिटाला सर्व नियोजित कामकाज गदारोळात पूर्ण झाले. सभापतींनी दिवसभराचे कामकाज संपल्याची घोषणा केली.

तालिका सभापतींची निवड
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी तालिका सभापती म्हणून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया, राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, भाजपचे अनिल सोले, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची निवड केली.

Web Title: The first day of the convention ended in the 5th minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.