बुलढाण्यात पहिले जिल्हा मराठी संमेलन
By admin | Published: March 18, 2017 02:46 AM2017-03-18T02:46:27+5:302017-03-18T02:46:27+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याच्या घटक संस्थांच्या शाखांच्या सहकार्याने जिल्ह्याजिल्ह्यांत संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिले एकदिवसीय
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याच्या घटक संस्थांच्या शाखांच्या सहकार्याने जिल्ह्याजिल्ह्यांत संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिले एकदिवसीय जिल्हा मराठी संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड या गावी २६ मार्च रोजी पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड असणार आहेत.
करवंड येथील परिसराला ‘राजमाता जिजाऊ साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन २६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होईल. तर कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे प्रमुख अतिथी असतील. या संमेलनात येथील गावकऱ्यांसोबत पारंपरिक लोकवाद्य व लोककलावंतांचा सहभाग असणारी ग्रंथदिंडी सकाळी ८.३० वाजता निघून संमेलनस्थळी उपस्थित राहील. ‘शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शासनासह प्रसारमाध्यमे, लेखक, कलावंत, उदासीन होत आहेत’ या विषयावर टॉक शो होणार आहे. तर या संमेलनात बालमेळावाही आयोजित केला आहे. तसेच, नवोदितांना भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक मार्गदर्शन समीक्षक डॉ. एस.एम. कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध लेखक डॉ. सदानंद देशमुख व रवींद्र इंगळे करतील.
तसेच डॉ. शोभा नाफडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथनात राम मोहिते, वंदना ढवळे, बबन महामुने, कड्डबा बनसोड, साधना लकडे हे जिल्ह्यातील कथालेखक सहभागी होतील. (प्रतिनिधी)