पहिली ते आठवीची मूल्यमापन चाचणी आजच होणार - शिक्षण विभाग
By admin | Published: April 6, 2017 05:30 AM2017-04-06T05:30:51+5:302017-04-06T05:30:51+5:30
पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे घेतली
मुंबई: पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे घेतली जाणारी मूल्यमापन परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे गुरुवारपासून घेतली जाणार आहे. बुधवारी मूल्यमापन परीक्षेचा आठवीचा पेपर फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याने वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मूल्यमापन करण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भाषा विषयासाठी घेतली जाते. या विषयांची संकलित मूल्यमापन २ ही चाचणी ६, ७ एप्रिलला घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परीक्षेच्या आदल्या दिवशी आठवीचा एक पेपर फुटल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलल्याचे वृत्त पसरले होते. प्रथम भाषा विषयाची लेखी चाचणी ६ एप्रिल रोजी आणि गणिताची लेखी चाचणी ७ एप्रिल रोजी घेण्यात येईल. (प्रतिनिधी)