पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ हिंजवडीत
By Admin | Published: February 19, 2016 03:37 AM2016-02-19T03:37:01+5:302016-02-19T03:37:01+5:30
हिंजवडी आयटी पार्क परिसरात संरक्षण विभागाच्या मागणीनुसार राज्यातील पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर’ (हब) उभारण्यात येणार आहे.
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात संरक्षण विभागाच्या मागणीनुसार राज्यातील पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर’ (हब) उभारण्यात येणार आहे. यासाठी वक्फ बोर्डाने सुमारे ३० एकर जागा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
आगामी पाच वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ निर्माण करण्याची घोषणा शासनाने नुकतीच केली. त्यामध्ये सुमारे १२०० कोटी डॉलरच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यभरात या उपक्रमामुळे सुमारे एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या या प्रस्तावाला प्रतिसाद देत पुण्यातील संरक्षण विभागाने पहिले ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ हिंजवडी परिसरात उभारण्याची मागणी केली होती.
संरक्षण विभागाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा पुरवठा करणारे सुमारे २० ते २५ लघुउद्योग व कारखाने पुण्यातील पर्वती परिसरात आहेत. मात्र, ही जागा कमी पडत असून, वाहतुकीलाही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनविणारे सर्व लघुउद्योग, कारखाने व पुरवठादार कंपन्या एकाच छताखाली उभारण्याची मागणी संरक्षण विभागाने ‘एमआयडीसी’कडे केली होती. त्यावर ‘एमआयडीसी’ने वक्फ बोर्डाकडे जागेचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार बोर्डाने जागा ताब्यात देण्याची तयारी दाखविली आहे. (प्रतिनिधी)