आयटीआय प्रवेशाची प्रथम प्रवेश यादी जाहीर
By Admin | Published: July 6, 2015 03:17 AM2015-07-06T03:17:38+5:302015-07-06T03:17:38+5:30
राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेशाची प्रथम प्रवेश यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये ८९ हजार १५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.
मुंबई : राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेशाची प्रथम प्रवेश यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये ८९ हजार १५४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, राज्यातील ३९ हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीची संस्था मिळाली आहे. आयटीआयच्या प्रवेशासाठी एकूण १ लाख ३0 हजार ९00 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाची प्रथम यादी तांत्रिक अडचणींमुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकली नव्हती. अखेर ही यादी रविवारी सकाळी जाहीर करण्यात आली. प्रथम प्रवेश फेरीची संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीचे अलॉटमेन्ट लेटर त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्याने सादर केलेल्या पसंतीक्रमाच्या प्रथम विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्या विद्यार्थ्याला प्रवेश निश्चित करावा लागेल. विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्याला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील प्रवेश फेरीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. प्रथम फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे.