महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग; 'एमआयडीसी' उभारणार तब्बल 2 हजार एकरमध्ये 'लेकसिटी'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 02:37 PM2021-01-14T14:37:42+5:302021-01-14T14:38:19+5:30
औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन लेक सिटीची निर्मिती एमआयडीसीच्या तळेगाव टप्पा चारमध्ये 6 हजार एकर मध्ये 60 व 40 प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवास क्षेत्रचा विकास करण्यात येणार आहे.
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ( एमआयडीसी) च्या मावळ तालुक्यातील तळेगाव टप्पा चार मध्ये महामंडळाच्या वतीने तब्बल 2 हजार एकर पेक्षा अधिक जागेत आंध्र धरणाच्या बॅकवॉटर लगत आंतरराष्ट्रीय दर्जाची लेक सिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामुळे एखाद्या एमआयडीसी क्षेत्रात औद्योगिक विकासासोबतच अशा प्रकारी लेकसिटीची निर्मिती हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव टप्पा चार मध्ये एमआयडीसी साठी तब्बल 6 हजार एकरचे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या टप्पा चार साठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. देशात बंगलोर नंतर महाराष्ट्रात प्रथमच तळेगाव टप्पा चार मध्ये हार्डवेअरची इंडस्ट्रीज उभी राहात आहे. तळेगाव टप्पा चार मधील 6 हजार एकर मध्ये पूर्णपणे प्रदुषण विरहित (नाॅन.... ) इंडस्ट्रीज उभारण्यात येणार आहेत. यात सर्वाधिक भाग हा हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्याचा असणार आहे. या औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणीची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रहिवास सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ही लेकसिटी उभारण्यात येणार आहे.
आंध्र धरणालगतच्या प्रचंड निसर्गरम्य परिसर तब्बल दोन हजार एकर पेक्षा अधिक जागेत ही लेकसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी तळेगाव टप्प्या चार मधील निगडे, पवळेवाडी, आंबळे आणि कल्हाट या गावातील गावठाण सोडून शिल्लक जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या लेकसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या युनिव्हर्सिटी पासून गोल्फ क्लब, हाॅस्पिटलसपासून सर्व प्रकारच्या हायक्लास डेव्हलपमेंट करण्यात येणार आहेत. यासाठी एमआयडीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे पुण्यात सहारा सिटी, लवासा सिटी नंतर आणखी एक लेक सिटी उभे राहणार आहे.
-------
औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन लेक सिटीची निर्मिती एमआयडीसीच्या तळेगाव टप्पा चारमध्ये 6 हजार एकर मध्ये 60 व 40 प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवास क्षेत्रचा विकास करण्यात येणार आहे. यामुळेच तब्बल 2 हजार एकर मध्ये ही लेक सिटी उभारण्यात येणार आहे. यात सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी एमआयडीसीने आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविण्यात आल्या आहेत.
- अविनाश हदगल, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी
--------
अशी असेल ही लेकसिटी
- एमआयडीसीचा राज्यातील पहिला प्रयोग
- सहा हजार एकर पैकी 2 हजार एकर रहिवास क्षेत्रासाठी राखीव
- आंध्र धरणालगत अत्यंत निसर्गरम्य परिसरात लेकसिटी
- लेकसिटीत गोल्फ क्लब पासून आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी, हाॅस्पिटलस्
- लेक सिटीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निविदा
- पुणे- मुंबई शहराल कनेक्ट असलेली सिटी
- प्रथम औद्योगिक क्षेत्राचा विकास नंतर लेकसिटीची डेव्हलपमेंट
- औद्योगिक क्षेत्रात शंभर टक्के नाॅन पोल्यूटेड कंपन्या