महापालिकेची पहिली नेत्रपेढी बोरीवलीत
By admin | Published: November 2, 2016 01:58 AM2016-11-02T01:58:06+5:302016-11-02T01:58:06+5:30
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर नेत्रपेढी उभारण्याचे प्रशासकीय स्तरावर प्रस्तावित करण्यात आले
मुंबई : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर नेत्रपेढी उभारण्याचे प्रशासकीय स्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबत गेल्या महिन्यात सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे नेत्रीपेढी विषयक अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्था वा वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यात येणारी ही नेत्रपेढी अशा प्रकारची पहिलीच नेत्रपेढी ठरणार आहे. ह्यआर मध्यह्ण विभागातील एक्सर गावामध्ये उभारण्याचे प्रस्तावित असणाऱ्या या नेत्र पेढीमुळे भविष्यात महापालिकेच्या रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत सुविधा मिळण्याचा अजून एक पर्याय मिळू शकणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर नेत्रपेढी उभारण्याची निविदा प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर अंतिम टप्प्यात आहे. पालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बोरिवली पश्चिम परिसरातील एक्सर गावामध्ये सार्वजनिक - खाजगी भागीदारी तत्त्वावर नेत्र-पेढी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. एक्सर गावामधील ‘सीटीएस क्रमांक ३४४ डी व ३४४ इ’ या भूखंडावर असणाऱ्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील महापालिकेच्या मालकीच्या १२७५ चौरस फुटांच्या जागेत नेत्र-पेढी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>नेत्रपेढीची वैशिष्ट्ये
निविदा प्रक्रियेअंती निवड करण्यात येणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला महापालिकेची
ही जागा नाममात्र भाडेतत्त्वावर १० वर्षांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निवड होण्याऱ्या संस्थेद्वारे सादर जागेत अत्याधुनिक व मान्यताप्राप्त तंत्रज्ञानावर आधारित नेत्र-पेढी
उभारणे अपेक्षित असणार आहे.संस्थेने नेत्रदान विषयक जाणीव-जागृती मोहीम नियमित स्वरूपात राबविणे देखील बंधनकारक असणार आहे.
दान स्वरूपात प्राप्त होणाऱ्या डोळ्यांवर आवश्यक ती शास्त्रीय प्रक्रिया करणे, शास्त्रीय पद्धतीनुसार सदर डोळे जतन करणे आणि जतन केलेले डोळे नेत्र रोपणासाठी रुग्णालयांना उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे. ज्यामुळे गरजूंना दृष्टीलाभ होऊ शकणार आहे.
नेत्र संकलन, नेत्र जतन व नेत्र वितरण या बाबी सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि नेत्रपेढी सुयोग्य पद्धतीने कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबांची प्रतिपूर्ती करणे ही देखील संबंधित संस्थेची जबाबदारी असणार आहे.इतर रुग्णालयांद्वारे संदर्भित करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत यथोचित शुल्क घेण्याची अनुमती सदर संस्थेला असणार आहे.