भाजपविरोधी आघाडीचा पहिला गियर मीच टाकला- राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:19 AM2018-05-26T02:19:10+5:302018-05-26T02:19:10+5:30
नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना अजूनही रद्द झालेली नाही.
रत्नागिरी : कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत सर्वच पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले, याचे श्रेय महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला आहे. सर्वांनी एकत्र यावे यासाठीचा पहिला गियर आपण गुढीपाडव्याच्या सभेमध्ये टाकला होता. सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन आपण केले होते. तेथूनच ही प्रक्रिया सुरू झाली, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना अजूनही रद्द झालेली नाही. मात्र शिवसेना कोकणवासियांना फसवत आहे. नाणारबाबत सेना-भाजप यांचे आतून मेतकूट जमले आहे. त्यांचा हा डाव येथील जनतेने ओळखला आहे. नाणारच काय पण कोकणात कोठेही हा प्रकल्प नको, असेते म्हणाले.
कोकणसारखी सुपीक जमीन देशात कुठेच नाही. अनेक क्षेत्रात मोठे झालेले लोक कोकणातील आहेत व ते देशात आणि परदेशातही मोठ्या पदांवर काम करीत आहेत. एवढे सगळे असताना जागा विकून स्थानिक लोक काय करणार? माझा विकासाला विरोध नाही, मात्र रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पाची गरज नाही. हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्यावा, असेही ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलतात!
रिफायनरी प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. रिफायनरी कुठेही न्या, मात्र कोकणात नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलतात. प्रकल्प अन्यत्र न्यायचा असेल तर गुजरातमध्येच कशाला, अन्य कोणत्याही राज्यात नेता येईल, असेही ठाकरे म्हणाले.