अकरावीची पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी ३० जूनला
By admin | Published: June 15, 2017 01:29 AM2017-06-15T01:29:39+5:302017-06-15T01:29:39+5:30
दहावीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी याआधी पहिला अर्ज भरला असून
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी याआधी पहिला अर्ज भरला असून, दुसरा अर्ज शुक्रवार, १६ जूनपासून भरता येणार आहे. तर, अकरावीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत २७ जूनपर्यंत असून, ३० जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार, चार गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा बेटरमेंटची संधी नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार पसंतीक्रम भरावा लागणार आहे.
१६ ते २७ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या कोट्यातील आरक्षित प्रवेश ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वारित जागा शिक्षण उपसंचालक विभागाकडे सादर करण्याची सूचना कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. ३० जून रोजी अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर, १ ते ३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येणार आहे. विभागातर्फे चार गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतरही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसतील तर पाचवी यादी जाहीर करण्यात येणार आहे. अकरावी आॅनलाइनची सर्व प्रक्रिया ३ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
आरक्षित महाविद्यालयातील प्रवेश हे गेल्या वर्षीप्रमाणे महाविद्यालयांनीच भरायचे आहेत. मात्र, हे प्रवेश झाल्यावर त्याची माहिती आॅनलाइन भरायची असल्याचे आदेश उपसंचालक कार्यालयातर्फे महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक...
आॅनलाइन अर्ज भरणे - १६ ते २७ जूनपर्यंत
सर्वसाधारण यादी जाहीर - ३० जून,
सायंकाळी ५ वाजता
अर्जातील त्रुटी दुरुस्त करणे - १ ते ३ जुलै, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
प्रथम गुणवत्ता यादी - ७ जुलै, सायंकाळी ५ वाजता
पूर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे - ८, १० व ११ जुलै, सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत
द्वितीय यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलणे - १२ ते १३ जुलै, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
द्वितीय गुणवत्ता यादी जाहीर - १७ जुलै, सायंकाळी ५ वाजता
शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे - १८ ते १९ जुलै, सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत
तृतीय यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलणे - २० ते २१ जुलै, संध्या. ५ वाजेपर्यंत
तृतीय गुणवत्ता यादी जाहीर करणे - २५ जुलै, सायंकाळी ५ वाजता
शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे - २६ ते २७ जुलै, सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत
चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलणे - २८ ते २९ जुलै, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
चौथी गुणवत्ता यादी जाहीर करणे - १ आॅगस्ट, सायंकाळी ५ वाजता
शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे - २ ते ३ आॅगस्ट, सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत
२०१६ मधील कट आॅफ
कला शाखा : जास्तीत जास्त
९४.४% ते कमीत कमी ८०%
वाणिज्य : जास्तीत जास्त
९४.५% ते कमीत कमी ८९.८%
विज्ञान : जास्तीत जास्त
९३.२% ते कमीत कमी ९१%