‘अभिजात मराठी’ हे पहिले लक्ष्य: लक्ष्मीकांत देशमुख; संमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला विशेष मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 04:39 PM2017-12-10T16:39:33+5:302017-12-10T16:42:14+5:30
महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आज वाईट आहे हे वास्तव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदान मिळेल.
शफी पठाण
नागपूर : महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आज वाईट आहे हे वास्तव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदान मिळेल. त्यातून बरेच काही चांगले उपक्रम राबवता येतील. त्यामुळे माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विशेष प्रयत्न करणार असून ‘अभिजात मराठी’ हेच माझे पहिले लक्ष्य राहणार आहे, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भावी संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. संमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला त्यांनी विशेष मुलाखत दिली. देशमुख म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेत अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने मराठी भाषेचे संशोधन व सूक्ष्म अभ्यास करून मराठी कशी अभिजात आहे, याचे पुरावे संबंधित विभागाला सादर केले आहेत. मी लवकरच प्रा. रंगनाथ पठारे यांना भेटून चर्चा करणार असून त्यानंतर दिल्लीत पाठपुरावा सुरू करणार आहे. याविषयी प्रसंगी आंदोलनाचीही माझी तयारी आहे. मराठी ही ज्ञानभाषा व व्यवहार भाषा झाली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. त्यासाठी बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणे आवश्यक आहे. यासाठीही मी संमेलनाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासनाला विनंती करणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
मराठी विद्यापीठ व संतपीठासाठी विशेष प्रयत्न
मराठी विद्यापीठाची मागणी जुनीच आहे. हे विद्यापीठ मराठीचे आद्यकवी मुंकुदराज स्वामींच्या अंबेजोगाई या गावी व्हावे, असाही एक मतप्रवाह आहे. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. यासोबतच पैठणला संतपीठ व्हावे, यासाठी शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. तो विषयही प्रलंबित आहे. याकडे मी संमेलनाध्यक्षाच्या पदावरून शासनाचे लक्ष वेधणार आहे.
संमेलनासाठी एक कोटीची मागणी योग्यच
जागतिक तामीळ महोत्सवासाठी तामीळनाडू सरकारने ३०० कोटींचा खर्र्च केला. कानडी साहित्य संमेलनासाठी कर्नाटक सरकारने आठ कोटी रुपये दिल्याचे उदाहरणही ताजेच आहे. आपले राज्य सरकार मात्र खूप कद्रुपणा करीत आहे. आजच्या महागाईच्या काळात २५ लाखांच्या अनुदानात काहीच होत नाही. म्हणून साहित्य महामंडळ जी संमेलनसाठी एक कोटीची मागणी करीत आहे तिचे मी समर्थन करतो.
अध्यक्षीय भाषणासाठी ऐकणार ‘मन की बात’
माण्या अध्यक्षीय भाषणात कुठल्या-कुठल्या विषयाला स्पर्श केला जावा, मतदारांना व मराठी जणांना याबाबत काय वाटते, हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी मी लवकरच काहींना पत्र पाठवून त्यांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेणार आहे. त्या अपेक्षा, सूचनांचा अध्यक्षीय भाषणात समावेशही करणार आहे. बडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे. या शहरात होणाºया समेलनाचे अध्यक्षपद मला लाभले हे मी माझे सौभाग्य समजतो. सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार. मी कार्यर्ता होतो, यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.